रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या घटना ऐकल्या असतील. पण डॉक्टरानेच उपचारासाठी आलेल्या रूग्णाला मारहाण केल्याचे समोर आले आहे. जयपूरमधील सवाई मानसिंह मेडिकल कॉलेजमध्ये रविवारी ही घटना घडली आहे. रुग्णाला मारहाण केल्याचा व्हिडीओ एएनआयनं पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर मानवाधिकार आयोगानं रुग्णालयाला २५ जून पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शार्मा यांनीही याप्रकरणावर अहवाल मागवला आहे.

रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, जयपूरमधील चांदपोल बाजार परिसरातील ३० वर्षीय मुबारिक (वय ३०) याला एक जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विषारी औषध पिल्यामुळे आणि पोटाच्या विकारामुले त्याच्यावर उपचार सुरू होते. मुबारिकच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी महिला डॉक्टर गेल्या असता तो हिंसक झाला. त्यानं डॉक्टरला मारहाणही केली. तिथे उपस्थित अन्य एक पुरुष डॉक्टर आणि नातेवाईकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही रुग्णानं मारहाण केली.

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डी. एस. मीणा यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फेरफार झाल्याचे सांगितले. रूग्ण आता ठणठणीत असून लवकरच त्याला डिसचार्ज देण्यात येईल. रुग्णालय समिती या सर्व घटनेची चौकशी करेल आणि त्याचा अहवाल मानवाधिकार आयोगाला पाठवेल असेही ते म्हणाले.