काही गोष्ट साचेबद्धपणे ठरवून दिलेले काम करतात तर काही आपली जबाबदारी म्हणून अधिक कष्ट घेत हाती घेतलेले काम अधिक चांगल्या पद्धतीने पुर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा आपल्याला आखून दिलेल्या मर्यादांच्या बाहेर जाऊन अनेकजण काम करताना दिसता. असंच काहीसं घडलं तेलंगणमधील एका गावामध्ये जेव्हा एका सरकारी डॉक्टरांनेच चक्क एका महिलेला आणि तिच्या दोन नवजात बालकांना खांद्यावर घेऊन पाच किलमोटीरचे अंतर पार करत दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले.

‘द हिंदू’ने दिलेल्या वृत्तानुसार पलवांचा येथील राला चेलूका या गावामधील २२ वर्षीय सुकी नावाच्या महिलेची प्रसुती झाली. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र प्रसुतीनंतर तिच्या शरिरातून होणारा रक्तस्त्राव थांबत नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यावेळी तिची प्रसुती करणाऱ्या डॉ. एल. रामबाबू यांनी तिला जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. या महिलेला रामबाबू यांनी आहे त्या स्थितीमध्ये सरकारी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र हा भाग अतिशय दूर्गम आणि जंगली प्रदेशात असल्याने वाहने तेथे पोहचू शकत नसल्याने रामबाबू यांनी खांद्यावर कावड करुन या महिलेला आणि तिच्या दोन्ही नवजात बालकांना मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने रुकी झोपलेली त्याच खाटेला चारीबाजूंनी सुतळी बांधून त्या एका बांबूला बांधत त्याची कावड तयार केली. त्यानंतर डॉ. रामबाबू यांनी डोलीची पुढची बाजू स्वत:च्या खांद्यावर घेतली तर मागील बाजू रुकीच्या कुटुंबियांनी आलटून पालटून संभाळली. पाच किलोमीटरपर्यंत असा प्रवास झाल्यानंतर अखेर रुकी आणि तिची दोन्ही जुळी मुलं मुख्य रस्त्यावर पोहचली तेथून त्यांना वहनांच्या मदतीने सरकारी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

उलवानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या रामबाबू यांनी दाखवलेल्या प्रसंगावधाना त्या महिलेचे आणि तिच्या बाळांचे प्राण वाचले. प्राथमिक उपचार झाल्यानंतर या तिघांनाही भाडराचमल या जवळच्या शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘प्रसुती झालेल्या महिलेचा रक्तस्त्राव थांबत नसल्याचे माझ्या लक्षात आले. तसेच तिने जन्म दिलेल्या दोन्ही जुळ्यांचे वजन अपेक्षेपेक्षा कमी असल्याने त्यांनाही त्रास होत होता. त्यामुळेच आदिवासी वस्ती अशणाऱ्या भागांमध्ये या नवजात बालकांनाही त्रास होण्याची शक्यता होती. म्हणूनच मी कुटुंबियांना विश्वासात घेऊन या तिघांनाही आरोग्य केंद्रात हलवण्याचा निर्णय घेतला. आम्ही या तिघांना एका डोलीमध्ये मामीदीगुदेम येथील रस्त्यापर्यंत घेऊन आलो आणि तिथून त्यांना भाडराचमल येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेलो,’ अशी माहिती रामबाबू यांनी दिली.

या संपूर्ण प्रसंगानंतर रामबाबू यांचे कौतुक होत असले तरी यामुळे पुन्हा एकदा आदिवासी भागातील वैद्यकिय सोयीसुविधांच्या उपलब्धतेबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे.