इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. के.के. अग्रवाल सध्या चर्चेत आहेत. पत्नीसोबत न जाता एकट्यानेच करोना व्हॅक्सिन घेतल्यामुळे अग्रवाल यांची पत्नी त्यांची ‘खरडपट्टी’ काढत असतानाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता के.के. अग्रवाल यांनी स्वतः त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पहिले बघूया काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये :
डॉ. के.के. अग्रवाल यांनी पत्नीला सोबत न घेऊन न जाता एकट्याने करोना व्हॅक्सिन घेण्याची ‘चूक’ केली आणि त्यानंतर जे झालं ते इंटरनेटवर व्हायरल होतंय. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पत्नी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढताना दिसतेय. एकट्याने व्हॅक्सिन घेतल्याची चूक केल्यानंतर डॉक्टर साहेबांनी लाइव्ह व्हिडिओ सेशन सुरू असताना पत्नीचा फोन उचलण्याची दुसरी चूक केली आणि पत्नीने त्यांची खरडपट्टी काढण्यास सुरूवात केली. खरं म्हणजे एकटेच व्हॅक्सिन घेण्यासाठी गेल्यामुळे डॉक्टरांची पत्नी चिडली होती. त्यांना इतका राग आला होता की त्यांचा ओरडण्याचा आवाज फोनबाहेर स्पष्ट ऐकायला येत होता. सध्या ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. कारमध्ये बसून लाइव्ह सेशन करत असतानाच त्यांना पत्नीचा फोन येतो. डॉक्टर साहेब फोनवर वारंवार पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करतात की ते फक्त व्हॅक्सिनचं लसीकरण सुरू आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी गेले होते, पण आता कोणीही नाहीये त्यामुळे लसीकरण करुन घ्या असं सांगितलं म्हणून मी केलं. तर, पत्नी वारंवार त्यांना मला का नाही घेऊन गेलात, खोटं बोलू नका असं सुनावत असल्याचं ऐकायला येतंय. ‘मी घरी येऊन बोलतो, आता मी लाइव्ह आहे’ असं सांगून डॉक्टर आपल्या पत्नीला शांत करण्याचा प्रयत्नही करतात. पण, पत्नी त्यांचं काहीही ऐकून घेत नाही. इतकंच नाही तर फोन ठेवताना ‘मैं भी अभी लाइव आ के तुम्हारी ऐसी की तैसी करती हूं’ असंही त्यांची पत्नी म्हणताना दिसतेय. बघा व्हायरल व्हिडिओ


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर के.के. अग्रवाल यांनी दिली प्रतिक्रिया :-
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता के.के. अग्रवाल यांनी स्वतः त्यावर प्रतिक्रिया दिलीये. “माझा जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं याचा मला आनंद आहे. या अडचणीच्या काळात हास्य हेच सर्वात उत्तम औषध आहे. माझ्यामुळे तुम्हाला जो आनंद झाला ते दुसरं काहीही नव्हतं तर फक्त पत्नीला माझ्या प्रकृतीबाबत आणि सुरक्षेबाबत असलेली चिंता होती. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा व्हॅक्सिन नक्की घ्या. माझ्या व्हिडिओमुळे लाखो लोकांना व्हॅक्सिनचं महत्त्व कळलं याचा आनंद आहे. करोना व्हॅक्सिन न घेणं हे माझ्या व्हिडिओपेक्षा जास्त हास्यास्पद असेल”, अशा आशयाचं ट्विट अग्रवाल यांनी केलं असून व्हॅक्सिन घेण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.