नावाच्या साधर्म्यामुळे किती मोठा घोळ होऊ शकतो याचं ताजं उदाहरण सुश्रूता ट्रॉमा सेंटरमध्ये पाहायला मिळालं. या रुग्णालयात आलेल्या विजेंद्र त्यागी यांची सर्जरी करायची होती पण चुकून त्यांच्या पायाची सर्जरी करण्यात आली. या सर्जरीमुळे विजेंद्र यांना चालता येत नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

विजेंद्र त्यागी यांचा अपघात झाल्याने त्यांचा डोक्याला गंभीर जखम झाली होती. उपचारासाठी त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याचवेळी त्या वॉर्डमध्ये एक रुग्ण पाय फ्रॅक्चर झाल्याने भर्ती करण्यात आला होता. विरेंद्र असं त्याचं नाव होतं पण, विजेंद्र आणि विरेंद्र या नावातील घोळामुळे डॉक्टरांनी विरेंद्रच्या पायावर सर्जरी करण्याऐवजी विजेंद्र त्यागी यांच्या पायावर सर्जरी केली.

‘जखम झाल्याने माझ्या वडिलांच्या डोकं आणि छातीत अद्यापही वेदना होत आहेत. विनाकारण करण्यात आलेल्या सर्जरीमुळे माझ्या वडिलांना चालता येत नाहीये’, असं विजेंद्र त्यागी यांची मुलगी अंकिताने सांगितलं आहे. मात्र कुटुंबाने डॉक्टराविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. अंकितानं केलेल्या आरोपात तथ्य असल्याचं सांगत डॉक्टरांनी संबंधित सर्जनवर कारवाई केली आहे.