आपल्या स्वभावातील प्रामाणिक वृत्तीमुळे कुत्रा आणि मानवाचं घनिष्ठ नातं निर्माण झालं आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात आपल्याला पाळीव कुत्रा पाहायला मिळतो. राखणदार, प्रामाणिक स्वभावामुळे आपल्या मालकाशी असलेले एकनिष्ठ नाते आणि आपल्या माणसांवर निरपेक्ष प्रेम ही सामान्यपणे कुत्र्याची वैशिष्टय़े म्हणता येतील. अशाच एकनिष्ठ आणि आपल्या मालकावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या कुत्र्याने मालकासाठी आपल्या प्राण्यांचा त्याग केल्यांच समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर या कुत्र्याचा फोटो आणि त्याने केलेल्या कृतीची चर्चा रंगत आहे.  तामिळनाडूमधील तंजावर येथे एका कुत्र्याने आपल्या मालकाचे प्राण वाचाविण्यासाठी एका पाच फूट लांब कोब्रासोबत झुंज दिली. कुत्र्याने दिलेल्या झुंजीमध्ये कोब्रा ठार झाला असून कुत्र्यालादेखील त्याचे प्राण गमवावे लागले आहेत.

तंजावर येथे राहणाऱ्या नटराजन हे त्यांच्या शेतामध्ये काम करत होते. यावेळी त्याचा कुत्रा पप्पीदेखील त्यांच्यासोबत होता. नटराजन शेतीची काम करत असताना झाडांमधून एक पाच फूट लांब कोब्रा नटराजन यांच्या दिशेने येत होता. कोब्रा आपल्या मालकाच्या दिशेने येत असल्याचं पाहिल्यानंतर त्यांचे प्राण वाचविण्यासाठी या कुत्र्याने तात्काळ कोब्रावर झडप घालत हल्ला चढविला. यावेळी कोब्रा आणि कुत्र्यामध्ये झटापट झाली. या दोघांची झटापट पाहून नटराजन घरात काठी आणण्यासाठी गेले. मात्र या दरम्यान, पप्पीने कोब्राला ठार केलं होतं. कोब्रा ठार झाल्यानंतर नटराजन यांनी पप्पीला जवळ घेतलं. परंतु काही क्षणातच पप्पीनेदेखील त्याचे प्राण सोडले.

या घटनेनंतर संपूर्ण तंजावरमध्ये कुत्रा आणि कोब्रा यांच्यामधील झटापटीची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. मात्र नटराजन यांनी त्यांचा चांगला सोबती गमावल्याची हळहळही व्यक्त करण्यात आली.