कुत्रे आणि मालक यांचे प्रेम आपण नेहमीच पाहतो. मालक घरी आला की धावत जाणारा हा इमानदार प्राणी आपल्या मालकावर मनापासून प्रेम करत असतो. तो माणसाचा खूप जवळचा मित्र असतो असे आपण अनेक वर्षांपासून पाहत आलो आहोत. घराची राखण करण्याबरोबरच पाळीव कुत्रा आपल्या मालकाशी दंगा-मस्ती करतो आणि अगदी घरातील प्रत्येक गोष्टीत त्याचा विशेष सहभाग असतो. अशाच कुत्रे आणि मालकाच्या अनोख्या नात्याची झलक नुकतीच पहायला मिळाली.

आपल्या पॅरालिसिस झालेल्या मालकाला व्हीलचेअरवरुन नेणारा त्याचा कुत्रा पाहून तुमचेही हृदय हेलावून जाईल. हा व्हिडियो फिलिपाईन्समधील असून हे कुत्रे आपल्या मालकाची व्हीलचेअर रस्त्यावरुन ढकलत नेत असताना दिसत आहे. हा व्हिडियो फेसबुकवर शेअर करण्यात आला असून त्यासा नेटीझन्सची मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळत आहे. फेथ एल रेविएल हीने हा व्हिडियो रेकॉर्ड करुन आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा अतिशय वेगळ्या आणि हृदयस्पर्शी प्रसंगाचे आम्ही साक्षीदार आहोत. आता यापुढे मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाही असेही तिने पुढे म्हटले आहे.

व्हील चेअरवर असलेल्या व्यक्तीचे नाव डॅनिलो अलारकॉन असे आहे. हा व्यक्ती ४६ वर्षांचा असून त्याला मणक्याची इजा झाल्याने तो व्हीलचेअरवर आहे असे वृत्त येथील स्थानिक वृत्तपत्राने दिले आहे. काही वर्षांपूर्वी दुचाकीच्या झालेल्या अपघातात त्याला मार बसला आणि इजा झाली. मागच्या अनेक वर्षांपासून त्याचा डिगाँग नावाचा कुत्रा त्याच्यासोबत आहे असेही या वृत्तामध्ये म्हटले आहे. या दोघांनाही असे एकमेकांसोबत पाहून आम्हाला खूप आनंद धाला आणि मग आम्ही डॅनिलो यांना एका छान रेस्तरॉमध्ये ट्रीट देण्यासाठी घेऊन गेलो असेही रेविएल हीने सांगितले.