कुत्र्याने चक्क अंगठी गिळल्याची एक घटना समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेत ही घटना घडली आहे. एक्स-रे काढला असता कुत्र्याने अंगठी गिळली असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर कुत्र्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांना त्याच्या पोटातून अंगठी बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. रुग्णालयाने फेसबुकवर कुत्र्याचा फोटो शेअर करत घडलेला प्रकाराची माहिती दिली आहे.

फोटोमध्ये कुत्रा तोंड पाडून बसलेला दिसत आहे. अंगठी मिळवण्यासाठी डॉक्टरांनी कुत्र्याला इंजेक्शनच्या माध्यमातून औषध दिलं होतं. जेणेकरुन त्याने उलटी करावी आणि अंगठी बाहेर पडावी. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “माझा चेहरा तुम्हाला मळमळ झाली असावी असा दिसतोय का ? कारण डॉक्टरांनी नुकतंच मला उलटी व्हावी यासाठी काहीतरी दिलं. मी माझ्या मम्मीची साखरपुड्याची अंगठी गिळली होती म्हणून त्यांनी असं केलं. बाकी काही विचारु नका…त्यावेळी ही चांगली आयडिया आहे असं मला वाटलं होतं”.

पशुवैद्यकीय रुग्णालयाने कुत्र्याचा एक्स-रे देखील शेअर केला आहे. यावेळी त्याच्या पोटात अंगठी असल्याचं दिसत आहे. कुत्र्याने उलटी केल्यानंतर अंगळी मिळवण्यात डॉक्टरांना यश मिळालं आहे. ही डायमंड रिंग होती जी मालकाकडे परत सोपवण्यात आली आहे.