कुत्रा हा माणसाचा जीवलग मित्र मानला जातो. आपल्या मालकाचे प्राण वाचवण्यासाठी वेळप्रसंगी आपला जीवही तो धोक्यात घालू शकतो. मालकाशी नेहमीच इमान राखणाऱ्या एका कुत्र्यामुळे शेकडो पेंग्विनचे प्राण वाचले आहेत.

ऑस्ट्रेलियातील एका बेटावर शेकडो पेंग्विनचं वास्तव्य होतं. मानवी वस्तीपासून लांब असलेल्या या बेटांवर पेंग्विनची वस्ती होती. मात्र याच भागात कोल्ह्यांचा वावरही वाढू लागला. पेंग्विनची शिकार करून आयतं खाद्य मिळत असताना इथे कोल्ह्यांची संख्या वाढू लागली, त्यामुळे पेंग्विनचं अस्तित्त्व धोक्यात आलं. बीबीसीच्या वृत्तानुसार २००५ मध्ये इथे जवळपास ८०० पेंग्विन होते. मात्र सतत होणाऱ्या शिकारीमुळे या लहानग्या पेंग्विनची संख्या केवळ चारच उरली.

शेवटी इथल्या एका शेतकऱ्यानं मरेमा या लहानश्या कुत्र्याला या बेटावर आणलं. तो कोंबड्यांचं रक्षण करायचा. शेतकऱ्यानं पेंग्विनच्या रक्षणासाठी कुत्र्याला तिथे ठेवले बघता बघता कुत्र्याला घाबरून कोल्हांचा वावर या परिसरात एकदम कमी झाला. शेतकऱ्याच्या प्रयत्नामुळे आणि कुत्र्यांचं संरक्षण असल्यानं येथे पेंग्विनची संख्या २०० वर पोहोचली आहे. पेंग्विनची संख्या केवळ चारच उरली होती त्या पेंग्विनच्या जमातीला छोट्याशा पांढऱ्या कुत्र्यामुळे जीवनदान मिळालं.