पिझ्झासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या फास्ट फूड चेन डॉमिनोजकडून एखाद्याला दर महिन्याला मोफत पिझ्झा भेटला तर…वाचून तोंडाला पाणी आलं असेल. पण, ऑस्ट्रेलियाच्या एका दाम्पत्याला हेच ‘चवदार गिफ्ट’ खरोखर भेटलंय, या दाम्पत्याला डॉमिनोज पुढील ६० वर्षांपर्यंत दर महिन्याला मोफत पिझ्झा देणार आहे.

कारण काय ?:-
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये अलिकडेच एका जोडप्याने मुलाला जन्म दिला. आई-वडिलांनी मुलाचं नाव ठेवलं आणि त्याच नावामुळे आता आई-वडिलांचा आनंद गगनात मावत नाहीये. क्लीमेंटाइन ओल्डफील्ड आणि एंथनी लॉट असं या जोडप्याचं नाव असून त्यांना ९ डिसेंबर रोजी मुलगा झाला, त्यांनी मुलाचं नाव Dominic असं ठेवलं. पण, या नावामुळे आपल्याला इतकं भन्नाट गिफ्ट मिळणार असल्याची त्यांना कल्पनाच नव्हती.

डॉमिनोजने केलं होतं ऑनलाइन स्पर्धेचं आयोजन :-
ऑस्ट्रेलियामध्ये डॉमिनोजला ९ डिसेंबर रोजी ६० वर्ष पूर्ण होणार होती. त्यानिमित्त कंपनीने एका ऑनलाइन स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ९ डिसेंबरला जन्माला येणाऱ्या मुलाचं नाव Dominic असं ठेवल्यास त्यांना मोठं गिफ्ट दिलं जाईल अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. मात्र या स्पर्धेबाबत क्लीमेंटाइन ओल्डफील्ड आणि एंथनी लॉट यांना काहीही कल्पना नव्हती. योगायोगाने ९ डिसेंबर रोजीच त्यांच्या घरी पाळणा हलला, आणि त्यांनी त्याचं नाव Dominic ठेवलं. बाळासाठी हे नाव त्यांनी आधीच ठरवलं होतं.


नातेवाईकांना बाळाच्या नावाबाबत समजल्यावर त्यांनी दांम्पत्याला स्पर्धेबाबत सांगितलं आणि बाळाच्या जन्मानंतर काही तासांमध्येच त्यांना शानदार गिफ्ट मिळालं. डॉमिनोज कंपनीनेही आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली. प्रत्येक महिन्याला 14 डॉलरचा एक पिझ्झा पुढची 60 वर्ष या कुटुंबाला मोफत मिळणार आहे.