एकीकडे अमेरिकेसारख्या महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दुसरीकडे रशियासारख्या बलाढ्य देशाचे अध्यक्ष पुतिन.. नुकत्याच हेलसिंकी येथे पार पडलेल्या शिखर बैठकीत या दोन्ही नेत्याची भेट झाली. या भेटीची दखल जगभरातील माध्यमांनी घेतली. पण या भेटीचं फलित काय यावर प्रकाश टाकणारा बहुचर्चित ‘टाइम’ मासिकाचा अंक जुलैअखेर प्रसिद्ध होणार आहे. आणि यानिमित्तानं हटके पद्धतीनं ‘टाइम’ मासिकानं ट्रम्प- पुतीन यांच्या बैठकीवर ताशेरे ओढले आहेत.

विशेष म्हणजे ‘टाइम’नं या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आपलं मुखपृष्ठ अत्यंत प्रभावीपणे डिझाइन केलं आहे. हे मुखपृष्ठ सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला आहे. पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो मॉर्फ करून जे व्यक्तीमत्त्व उभं राहतं ते या मुखपृष्ठावर छापण्यात आलं आहे. या मासिकाच्या प्रसिद्ध व्हिज्युअल आर्टिस्ट नॅन्सी बॉर्सन यांनी ते डिझाइन केलं आहे. ‘राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांना पुतिनना भेटायचं होतं. त्यांना जी अपेक्षा होती त्यापेक्षा बरंच काही त्यांना मिळालं’ अशा शब्दात या भेटीच वर्णन करण्यात आलं आहे.

शिखर बैठकीवर प्रकाश टाकणारा हा अंक ३० जुलैला प्रकाशित होणार आहे. याचं मुखपृष्ठ टाइम मासिकानं ट्विट केला आहे. अध्यक्षीय निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याच्या प्रकरणात काम करणाऱ्या अमेरिकी अधिकाऱ्यांनी हवे असल्यास आमच्या देशातील अधिकारी करीत असलेल्या चौकशीत सामील व्हावे, असा प्रस्ताव अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी हेलसिंकी येथील शिखर बैठकीत मांडला होता.