अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अनपेक्षित यश मिळवून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी झालेत. त्यामुळे, येत्या जानेवारी महिन्यात अधिकृतरित्या राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष म्हटल्यावर त्यांच्या सुरक्षेसाठी आतापासून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी दरदिवशी करण्यात आलेला खर्च हा जवळपास ६ कोटींहूनही अधिक असल्याचे समोर आले आहे.

हा फक्त न्यूयॉर्क शहरातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा खर्च सांगितला जात आहे. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा देण्यात आली आहे. सध्या ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी १९० सिक्रेट सर्व्हिस एजंट तैनात करण्यात आले आहे तर हा आकाडा ९०० पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांची मुलं आणि नातवंड यांच्या सुरक्षेसाठी ही सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या एका दिवसाचा सुरक्षेचा खर्च हा सहा कोटी सत्तर लाखांहूनही अधिक असल्याचा आकडा अधिकृतरित्या जाहिर करण्यात आला आहे. खर्चाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जसे ट्रम्प आणि त्यांची पत्नी प्रवास करतील तशी सुरक्षा रक्षकांत आणखी भर पडणार आहे. ट्रम्प यांची पत्नी मेलानिया या वर्षभर तरी व्हाईट हाऊसमध्ये राहायला येणार नाहीत. ट्रम्प यांचा मुलगा बॅरॉन याच्या शिक्षणामुळे मेलानिया या मॅनहॅटनच्या ट्रम्प हाऊसमध्ये राहणार आहेत. याकाळात मेलानिया आणि बॅरॉन यांचे वरचे वर व्हाईट हाऊसमध्ये येणे जाणे सुरू राहणार आहे. त्यामुळे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी अधिकच वाढली आहे.