जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतल्यानंतर सोशल मिडियावर जम्मू काश्मीरमधील महिला आणि जमिनी विकत घेण्यासंदर्भात अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. भाजपाच्या काही वाचाळ नेत्यांनीही काश्मीरी महिलांसंदर्भात वादग्रस्त विधाने केली आहेत. अनुच्छेद ३७० रद्द करण्यासंदर्भात मागील सोमवारी ६ ऑगस्ट रोजी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये प्रस्ताव मांडल्यापासूनच काश्मीरमधील जमिनीच्या दरासंदर्भात मिम्स आणि विनोद व्हायरल होऊ लागले होते. त्यानंतर काही नेत्यांनी महिलांसंर्भातील वक्तव्य केली. याच पार्श्वभूमीवर जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने आपले मत नोंदवले आहे. काश्मीरी महिला आणि जमिनींवरुन विनोद करणाऱ्यांना पुनिया याने एका ट्विटमध्ये धोबीपछाड दिली आहे.

पुनियाने केलेल्या ट्विटमध्ये त्याने एक इच्छा व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, “ना कश्मीर में ससुराल चाहिए, ना ही वहां पर मकान चाहिए, बस कोई फौजी शरीर तिरंगे में लिपटकर न आये, अब ऐसा हिंदुस्तान चाहिए. जय हिंद जय भारत.” या ट्विटला त्याने पीन ट्विट (म्हणजेच त्याच्या प्रोफाइलवर गेल्यावर सर्व प्रथम दिसणारे ट्विट) केले आहे. हे ट्विट सात हजारहून अधिक जणांनी रिट्विट केले असून ४१ हजार जणांनी ते लाइक केले आहे.

दरम्यान, शनिवारी स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी हरयाणा सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती देताना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काश्मिरी महिलांसंदर्भात वादग्रस्त विधान केले. “आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री धनकर म्हणायचे की मुलांची संख्या वाढली आणि मुलींची कमी झाली तर त्यांच्या लग्नासाठी बिहारमधून मुली आणू. पण, जेव्हापासून काश्मीरातील कलम ३७० हटवण्यात आले तेव्हापासून लोक म्हणत आहेत की, आता काश्मीरातील मुली सूना म्हणून आणू शकतो. हा विनोदाचा भाग झाला. आता हरयाणाचे लिंगगुणोत्तर वाढले आहे. स्त्री-पुरूष गुणोत्तराचे संतुलन ठेवल्यास समाजातील स्थिती पुर्वपदावर येईल,” असं वक्तव्य खट्टर यांनी केलं होतं.