मद्यपान करुन गाडी चालवू नका असं अनेकदा प्रशासन आणि पोलिसांकडून सांगितलं जातं. मात्र काही तळीराम या सर्व नियमांकडे दुर्लक्ष करत स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात टाकताना दिसतात. अशा बेजबाबदार चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अनेक ठिकाणी नाकाबंदी करुन ब्रिद अ‍ॅनलायझरच्या मदतीने चालकाने मद्यपान केलेलं नाही ना हे तपासताना दिसतात. केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये अशापद्धतीची नाकेबंदी केली जाते. मात्र ब्रिटनचा भाग असणाऱ्या उत्तर आयर्लण्डमधील एका दारुड्याने एवढी दारु प्यायली होती की त्याने पोलिसांकडील ब्रिद अ‍ॅनलायझरच तोडला. या व्यक्तीला पोलिसांच्या संपत्तीला नुकसान पोहचवणं आणि दारु पिऊन गाडी चालवणं या दोन्ही गुन्ह्यांसाठी दंड ठोठावण्यात आलाय.

रविवारी (२८ मार्च रोजी) पहाटेच्या वेळी लंडनडेअरी शहरातील टोबेरमोअर येथील रस्त्यावर ही घटना घडल्याचं डेली मेलने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या चालकाला थांबवण्यानंतर नियमांप्रमाणे पोलिसांनी ब्रिद अ‍ॅनलायझरच्या मदतीने या चालकाची चाचणी केली असताना ब्रिद अ‍ॅनलायझरच तुटलं. या चालकाने एवढी दारु प्यायली होती की ब्रिद अ‍ॅनलायझरचाही काही उपयोग झाला नाही. त्यानंतर पोलीस या दारुड्या चालकाला पोलीस स्थानकामध्ये घेऊन गेले. तेथे दुसऱ्या एका ब्रिद अ‍ॅनलायझरच्या मदतीने या व्यक्तीच्या शरीरामधील दारुचं प्रमाण तपासून पाहिलं असता ते १८० पर्यंत आलं. हे प्रमाण कायद्यानुसार दिलेल्या परवानगीच्या पाच पट अधिक आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युकेच्या इतिहासामध्ये सर्वाधिक प्रमाणात मद्य शरीरात असतानाच पोलिसांनी कारवाई केलेल्या चालकांमध्ये या चालकाचा समावेश झालाय.

प्रत्येक १०० मिलिलीटरमागे ३५ मायक्रोग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी प्रमाण असल्यास युकेमध्ये चालकांवर कायदेशीर कारवाई केली जात नाही. हे प्रमाण स्कॉटलॅण्डमध्ये २२ मायक्रोग्रॅम इतकं आहे. यासंदर्भात पोलिसांनीही नाराजी व्यक्त करणारी पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हा चालक नागमोडी वळणं घेत गाडी चालवत असल्याने त्याचा थांबवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असताना तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका घराच्या गार्डनमध्ये गाडीसहीत घुसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आता २१ मार्च रोजी न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी होणार आहे.