न्यूयॉर्कमधील अतिशय जुना असा कोसियुझको पूल नुकताच पाडण्यात आला. हा पूल पाडतानाचा व्हिडिओ नुकताच समोर आला असून इतका महाप्रचंड पूल कशापद्धतीने पडत आहे हे यामध्ये अगदी स्पष्टपणे दिसते. ड्रोनच्या माध्यमातून याचे शूटींग केले असून त्यात अतिशय स्पष्टपणे पूल पडत असल्याचे दिसत आहे. १९३९ मध्ये बांधण्यात आलेला हा पूल ७८ वर्षे वाहतूकीसाठी वापरात होता. मात्र अखेर तो जुना झाल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून हा पूल पाडण्यात आला. क्रांतिकारी युद्धामध्ये सहभागी असलेल्या एका पोलिश सैनिकाच्या नावावरुन या पूलाचे नाव कोसियुझको ठेवण्यात आले होते.

हा पूल पाडतानाचे दृश्य पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पूलाच्या खाली असणारी नदी, आजूबाजूला असणाऱ्या इमारती आणि घरे आणि त्यातच हा पूल पडत असल्याने उडालेला धुराळा असे दृष्य व्हिडिओमध्ये बघायला मिळते. यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आतापर्यंत १ लाख ५८ हजार हून अधिक जणांनी तो पाहिला आहे.

हा पूल ब्रूकलिनमधील ग्रीनपॉईंटपासून क्वीन्समधील मासपेठपर्यंत जोडलेला होता. पूल बांधण्यासाठी अब्जावधींचा खर्च आला होता. या पूलालाच समांतर असा पूल बांधण्याचे काम याठिकाणी सुरु असून तो २०२० पासून प्रत्यक्ष वापरासाठी सुरु होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जुन्या झालेल्या पूलापासून कोणताही धोका उद्भवू नये यासाठी तो पाडण्यात येऊन नवीन पूल तयार करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.