मुंबईच्या कांदीवलीमध्ये एका २६ वर्षाच्या तरुणाला एटीएम मशिनची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी स्वाइप केलेले कार्ड अडकले, बराच वेळ प्रयत्न करुनही ते कार्ड न निघाल्याने नशेत असलेल्या या तरुणाने थेट मशिनची तोडफोड केली.

मिड डेने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये(पीसीआर) गुरूवारी दुपारी १२.३८ वाजण्याच्या सुमारास कॉल आला. लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील सेंट्रीअम मॉलमध्ये एक तरुण अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएमची तोडफोड करत असल्याची माहिती फोन करणाऱ्याने दिली. पीसीआरने तातडीने समता नगर पोलिसांना याबाबत अलर्ट केलं. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. पण त्यावेळी तिथे कोणीही नव्हते.

त्यानंतर पोलिसांनी फोन करुन माहिती देणाऱ्या इसमाशी संपर्क साधला आणि तोडफोड करणाऱ्या व्यक्तीचं वर्णन विचारलं. तसेच ती व्यक्ती कोणत्या दिशेने गेली याची माहिती पोलिसांनी घेतली. त्या दिशेने आरोपीचा तपास सुरू केला असता पोलिसांना क्रांती नगर रिक्षा स्टँड जवळ एक बाइक उभी दिसली. बाइकस्वार बाइक पार्क करुन झोपडपट्टीमध्ये पळून गेल्याचं तिथल्या काही लोकांनी पोलिसांना सांगितलं. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. संजय कुमार असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून घटनेवेळी तो नशेत होता, तो मालाड पश्चिमचा रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.