प्राण्यांवर प्रेम करावे अशी शिकवण लहानपणापासून सर्वांना दिली जाते. मात्र आज अनेक ठिकाणी प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या पहायला मिळतात. प्राण्यांविरोधातील अत्याचार वाढण्याचा घटना समोर येत असतानाच अमेरिकेमधील एका व्यक्तीने एका जखमी पक्ष्याला चक्क उबर बुक करुन दिल्याची मजेशीर घटना समोर आली आहे.

अमेरिकेत उथा येथे राहणारा टीम क्रॉवली त्याच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या मित्राच्या घरी दारु पित बसला होता. अंगणात बसून दारू पित असताना अचानक टीमला आकाशातून एक पक्षी खाली पडताना दिसला. हा पक्षी पडताना पाहताच दारुच्या नशेत असणाऱ्या टीम आणि त्याच्या मित्रांनी त्या पक्ष्याकडे धाव घेतली. उंचीवरुन पडल्याने या पक्ष्याला दुखापत झाली असेल असं या सर्वांना वाटले. त्यांनी लगेचच उत्तर उथा येथील वन्यजीव पुनर्वसन केंद्राला यासंदर्भात मेसेज करुन कळवले. त्या पक्ष्याला केंद्रात घेऊन या असे उत्तर या मेजेसवर वन्यजीव केंद्राने पाठवले. मात्र तेथे उपस्थित सर्वच जणांनी दारु प्यायली असल्याने ते गाडी चालवण्याच्या परिस्थिमध्ये नव्हते. त्यामुळेच गाडीने हा पक्षी केंद्रात सोडून येण्याऐवजी त्यांनी या पक्ष्याला चक्क उबर टॅक्सी बुक करुन दिली.

टॅक्सी बुक केल्यानंतर टीमच्या घराजवळ आलेल्या पहिल्या टॅक्सीवाल्याने पक्ष्याला घेऊन जाण्यास नकार दिला. मात्र टीमने पुन्हा एकदा दुसरी उबर बुक केली. या उबरची चालक असणाऱ्या क्रिस्टी गुआन हिने पक्ष्याला केंद्रात सोडण्यास होकार दिला. या प्रकाराबद्दल बोलताना क्रिस्टी म्हणते, ‘मी त्या पक्ष्याला गाडीतून घेऊन जात असताना गाडीत केवळ त्याचाच आवाज होता. मी गाडीतील एसी बंद करुन गाडीच्या खिडक्या उघडल्यानंतर तो पक्षी शांत झाला. गाडीतील तापमान खूपच थंड झाल्याने तो ओरडत होता असं मला नंतर जाणवलं.’

या पक्ष्याला क्रिस्टी केंद्रात घेऊन गेली तेव्हा दोन आठवड्यांपूर्वीच या पक्ष्याचा जन्म झाल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. उडण्याचा अनुभव नसल्याने हा पक्षी खाली पडला असावा असं अंदाज या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. टीमने उबर बुक करुन या पक्ष्याला केंद्रात पाठवल्याने त्याच्यावर औषधोपचार करता आले. उबर बुक करत टीमने पक्ष्याचे प्राण तर वाचवलेच पण दारुचे सेवन करुन स्वत: गाडी न चालवण्याचा निर्यण घेत रस्ता वाहतूक सुरक्षेच्या नियमांनाही महत्व दिले याबद्दल केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले आहे. ‘जर तुम्हाला रस्त्यात एखादा जखमी आणि एकटाच जंगली प्राणी सापडला आणि तुम्ही अशा परिस्थितमध्ये असता तर काय केलं असतं? पण या मदत करणाऱ्याने उबर बुक केली. जखमी लेसर गोल्डफिंच पक्षी उबर गाडीमधून चालकाबरोबर एकटाच केंद्रात आला. या पक्ष्याला मदत करणाऱ्याला धन्यवाद. त्याने मदत केल्यानेच या पक्ष्याला वेळेत आणि योग्य उपचार मिळाले. तसेच दारु पिऊन गाडी न चालवण्याचा निर्णय घेत त्याने स्वत:चा तसेच इतरांचाही विचार करुन रस्ता सुरक्षेला प्राधान्य दिले हे कौतुकास्पद आहे,’ असे मत केंद्रातील पशू अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.