विमानात अनेकदा वेगवेगळ्या घटना घडतात आणि त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झालेली पाहायला मिळते. कधी नवरा बायकोच्या भांडणामुळे विमानाचे लँडींग होते तर कधी विमानाचे छत गळ असल्याने प्रवाशांच्या अंगावर पाणी पडते. नुकतेच पायलटनी चालू विमानातून उतरुन किकी चॅलेंज केल्यामुळेही विमान प्रवासाबाबत चर्चा झाली होती. आता अशीच एक घटना घडली असून दारु प्यायलेल्या एका पुरुष प्रवाशाने नशेत सहप्रवासी असलेल्या महिलेच्या आसनावर लघवी केली. न्यूयॉर्कवरुन दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ही किळसवाणी घटना घडली आहे.

या प्रवासी महिलेच्या मुलीने ही घटना ट्विट करत या घटनेला वाचा फोडली आहे. केंद्रिय नागरी उड्डाण राज्य मंत्री जयंत सिन्हा यांनी या प्रकरणाची दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तक्रारदार महिलेच्या मुलीने आपल्या ट्विटमध्ये एअर इंडियालाही ट्विट केले आहे. यामध्ये तिने “न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी येथून दिल्लीला येत असताना माझ्या आईच्या आसनावर एका मुलाने पँट उतरवून लघवी केली. आई एकटीने प्रवास करत असल्याने तिच्यासाठी ही अतिशय लाज आणि किळस आणणारी गोष्ट होती. या गोष्टींबाबत संबंधित यंत्रणांनी उत्तर द्यावे.” असे म्हटले आहे.

तर जयंत सिन्हा यांनी याची दखल घेत एअर इंडियाला ट्विट करत या बाबतीत लक्ष घालून कंपनीने लवकरात लवकर चौकशी करुन त्याचे स्पष्टीकरण उड्डाण मंत्रालयाला द्यावे असे सांगितले आहे. आतापर्यंत एअर इंडियाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. दारुच्या नशेत अशाप्रकारचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीमुळे कंपनीला आणि सहप्रवासी असलेल्या महिलेला विनाकारण त्रास सहन करावा लागला आहे. मात्र विमानात अशाप्रकारची घटना घडणे हे घृणास्पद असून दारू पिऊन प्रवास करणाऱ्या व्यक्तीला योग्य ती अद्दल घडणेही तितकेच आवश्यक आहे.