३१ डिसेंबरच्या पार्टीत खूप मद्यपान करून दंगा केल्याचे किंवा घोळ घालून ठेवल्याचे शेकडो किस्से तुम्ही ऐकले असतील. पण, नॉर्वेमधल्या मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या एका तरुणाने जो काही घोळ घातला तो मात्र तुम्ही क्वचितच ऐकला असेल. दारूच्या नशेत हा माणूस टॅक्सीने तीन देश फिरला पण, जेव्हा त्यानं बिलाचा आकडा पाहिला तेव्हा हा प्रचंड आकडा पाहून त्यानं पैसे द्यायला चक्क नकार दिला.

या माणसानं कोपनहेगनवरून ओस्लोला आपल्या घरी जाण्यासाठी टॅक्सी बुक केली. ३१ डिसेंबरच्या पार्टीत मद्यप्राशन करून तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. कोपनहेगनवरून त्याच्या घरापर्यंतचा रस्ता हा ६०० किलोमीटरचा होता. हा रस्ता तसं पाहायला गेलं तर डेनमार्क, स्वीडन आणि नॉर्वे अशा देशातून जातो. या संपूर्ण प्रवासाचं भाडं २ हजार २०० अमेरिकनं डॉलर्स म्हणजे जवळपास १ लाख ३९ हजारांहून अधिक झालं. एवढा लांब पल्ला गाठल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रवाशाला चालकानं सुखरुप घरी सोडलं. इच्छित स्थळी त्याला सोडल्यानंतर जेव्हा चालकानं भाडं मागितलं तेव्हा त्यानं चक्क पैसे द्यायला नकार दिला. इतकंच नाही तर तो चालकासमोर झोपून गेला.

एवढी मोठी रक्कम असल्यानं चालकानं थेट ओस्लो पोलिसांना फोन करून घडलेला सारा प्रकार सांगितला. शेवटी पोलीस आल्यानंतर त्यानं चालकाचे पैसे देण्याचं मान्य केलं.