दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) आपल्या नवीन अ‍ॅप आयकॉनच्या डिझाइनमध्ये बदल केलाय. आपल्या ग्राहकांकडून आलेल्या नकारात्मक प्रतिक्रिया आणि नेटकऱ्यांकडून विरोध झाल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपच्या ‘लोगो’ची जर्मनीचा हुकूमशाह हिटलरच्या मिशीसोबत तुलना झाल्यामुळे कंपनीने लोगो बदलला.

अ‍ॅमेझॉनने जानेवारीमध्ये नवीन अ‍ॅप आयकॉनची डिझाइन सादर केली होती. 25 जानेवारी 2021 रोजी नवीन आयकॉनला अ‍ॅपवर अपडेट करताच सोशल मीडियातून विरोध होण्यास सूरूवात झाली. यात फिक्कट तपकिरी रंगाच्या कार्डबोर्ड बॉक्स दिसत असून त्याच्यावर कंपनीची सिग्नेचर स्माइल आणि टॉपला निळ्या रंगाची एक टेप होती.

सर्व वाद निळ्या रंगाच्या टेपवरुन सुरू झाला. अनेक सोशल मीडिया युजर्सनी अ‍ॅमेझॉनच्या या नवीन आयकॉनला हिटलरच्या मिशीसोबत जोडलं आणि टीकेला सुरूवात झाली. अनेकांनी डिझाइनबाबत पुन्हा विचार करण्याचा सल्लाही दिला होता. अखेर आता कंपनीने आपल्या लोगोमध्ये बदल केला आहे. अपडेट केलेल्या डिझाइनमध्ये फिक्कट तपकिरी रंगाचा कार्डबोर्ड बॉक्स आणि त्यावरील कंपनीची सिग्नेचर स्माइल तशीच आहे. पण निळ्या रंगाच्या टेपची स्टाइल बदलण्यात आली आहे, आता अर्धी टेप काढलेली दिसत आहे. हिटलरच्या मिशीप्रमाणे दिसू नये यासाठी कंपनीने हा बदल केलाय.


दरम्यान, टूथब्रश डिझाइनच्या मिशा सुरूवातीला चार्ली चॅपलिन यांच्यासारख्या हास्य कलाकारांमुळे प्रसिद्ध झाल्या होत्या, पण या मिशांना नेहमीच हिटलरशी जोडून बघितलं जातं.