अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या निर्णयामुळे आणि कामगिरीवर जगभरातील अनेक विचारवंतांनी वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले आहेत. सध्या डोनाल्ड ट्रम्प ब्रिटन दौऱ्यावर आहेत. यावेळी ते ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याशी चर्चा करणार आहेत. परंतु ट्रम्प-थेरेसा या भेटीला काही जणांनी विरोध दर्शवल आहे. आपला विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी चक्क ट्रम्प यांचा टॉयलेटवर बसलेला रोबो तयार केला आहे. यासाठी तब्बल १७ लाख रूपयांचा खर्च केला आहे.

आपला विरोध दर्शवण्यासाठी चक्क गोल्डन टॉयलेटवर बसलेला ट्रम्प यांचा तब्बल १६ फूट उंचीचा एक रोबो तयार केला आहे. विशेष म्हणजे हा बोलणारा रोबोट असून ट्रम्प यांनी आजवर केलेली वादग्रस्त विधाने प्रेक्षकांसमोर बोलून दाखवतो. या प्रकारामुळे हा रोबो सध्या चर्चेचा विषय आहे. अमेरिकेतील डॉन लेसम या व्यक्तीने तब्बल १७ लाख ४३ हजार रूपये खर्च करून या रोबोची निर्मिती केली आहे.

फिलाडेल्फियाचा रहिवासी असलेला डॉन लेसम चीनमधील एका कारखान्यात काम करतो. या कारखान्यात डायनॉसॉर सारख्या अक्राळ विक्राळ प्राण्यांचे पुतळे तयार केले जातात. या पुतळ्यांचा वापर प्राणी संग्रहालयात ठेवण्यासाठी केला जातो. “डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकांना असलेला आपला विरोध दर्शवण्यासाठी बोलणाऱ्या रोबोची निर्मिती केली आहे. रोबोची निर्मीती करताना माझ्या साथीदारांना या कृत्यासाठी तुरुंगवास होईल अशी भीती वाटत होती. परंतु त्यांना धीर देत याविषयी आत्मविश्वास दिला. आणि त्यांनी या रोबोची निर्मिती केली.” असे मत डॉन लेसम  याने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलताना  व्यक्त केले आहे. दरम्यान, याआधी डॉन लेसम  आणि साथिदारांनी ट्रम्प यांच्या ब्रिटन भेटीवेळी बेबी ट्रम्प बलून आकाशात सोडला होता. त्यावेळीही ते फार चर्चेत होते. सध्या या बोलणाऱ्या रोबटची सोशल मीडियावर चर्चा आहे.