केरळातील कोल्लम येथील दुर्योधन मंदिरातील अजबच घटना समोर आली आहे. एडक्कड़मधील दुर्योधन मंदिरात एका व्यक्तीने चक्क १०१ ओल्ड माँकच्या बाटल्या अर्पण केल्या आहे. या मंदिराचे पूर्ण नाव पोरुवझी पेरुवथी मलनाड दुर्योधन मंदिर असे आहे. या मंदिरात भक्त दारूच्या बाटल्या अर्पण करतात. वार्षिक उत्सवाच्या सुरूवातीलाच या मंदिरात एका भक्ताने आपल्या देवाला (दुर्योधन) ओल्ड माँकच्या १०१ बॉटल दान केल्या आहेत.

मंदिरामध्ये दारू अर्पण करण्यात येणारे दक्षिण भारतात असलेले हे एकमेव मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार या गावात दुर्योधन आले होते. त्यावेळी दुर्योधनाला तहान लागली होती. गावातील एका व्यक्तीने पाणी मागितल्यानंतर दुर्योधनाला तोड्डी (स्थानिक दारू) दिली. ती पिऊन तो खूप आनंदी झाला होता.

मंदिराचे सचिव एसबी जगदीश म्हणाले की, या मंदिरामध्ये विदेशी दारू अर्पण करण्याची प्रथा आहे. पूर्वी इथं अनेक प्रकारच्या गोष्टी अर्पण केल्या जात होत्या. त्यानंतर त्यावर प्रतिबंध लागले. दारूव्यतिरिक्त पान, चिकन, बकरी आणि सिल्कची कापडे सध्या भक्त अर्पण करतात. सोमवारी कोल्लमच्या एनआरआय भक्ताने या मंदिरात १०१ ओल्ड माँकच्या बाटल्या अर्पण केल्या.

प्रत्येक जाती धर्माचे लोक मंदिरामध्ये विदेशी दारूच्या बाटल्या अर्पण करतात. १९९० मध्ये मंदिरात आतिशबाजी केली जात होती. १९९० मध्ये आतिषबाजी दरम्यान २६ लोखांचा मृत्यू झाला. तेव्हापासून मंदिरात आतिषबाजी बंद करण्यात आली. वार्षिक उत्सव साध्या पद्धीतने साजरा केला जातो.  दुर्योधन मंदिराशिवाय कन्नूर येथील परास्सिनिकडवू मुथप्पन मंदिरामध्येही यापूर्वी विदेशी दारू अर्पण केली जात होती. पण सध्या त्यावर बंदी आणली आहे. आता फक्त या मंदिरात तोड्डी अर्पण केली जात आहे.