लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. हा क्षण खास करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने झटत असतो. सध्या वेगळ्या पद्धती अवलंबत लग्न करण्याचे फॅड वाढले आहे. कोणी हेलिकॉप्टरने कार्यालयात दाखल होते तर कोणी आणखी कशाने. पण एका जोडप्याने तर चक्का घोडा आणि डोलीऐवजी गरुडावरुनच लग्नमंडपात एन्ट्री घेतली. त्यांची ही एन्ट्री या लग्नात आणि एकूणच सोशल मीडियावर चर्चेचा चांगलाच विषय झाली. त्यांच्या एन्ट्रीचा व्हिडियो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. चर्चेत राहण्यासाठी आणि हटके काहीतरी करण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही, त्याचेच हे उदाहरण होते.

एका ट्विटर युजरने आपल्या ट्विटर हॅन्डवरून हा व्हिडीओ अपलोड केला आहे. हे लग्न एका गार्डनमध्ये असल्याचे दिसते. तिथे हे जोडपे गरुडावरुन आले. गरुडाला जाळीदार स्टँड लावण्यात आला होता. त्यामध्ये हे दोघेही उभे होते. गोल आकाराच्या या स्टॅंडला लाईटिंगही केली होती. त्याच्यावर एक मोठ्या आकाराची गरूडाची प्रतिकृती तयार केलेली होती. या गरुडाचे पंखही फडफडत होते. त्यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले गेले.

बॅकग्राउंडला ‘बहारो फुल बरसोओ मेरा मेहबूब आया है’ हे गाणंही वाजत होतं. क्रेनच्या सहाय्याने बांधलेल्या या अनोख्या गरुडातून गार्डनमध्ये संपूर्ण चक्कर मारून त्यानंतर ही प्रतिकृती स्टेजजवळ उतरविण्यात आली. मात्र हा व्हिडीओ नेमका कोणाच्या लग्नातील आहे आणि कोणत्या गावातील आहे तसेच कोणी शूटींग केले याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. अनेकांनी या आगळ्यावेगळ्या एन्ट्रीबाबत या जोडप्याचे कौतुक केले आहे. तर काहींनी त्यांना या गोष्टीमुळे नावेही ठेवली आहेत. मात्र हा व्हिडियो नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणात पाहिला आणि रिट्विट केला गेला आहे.