इराण-इराक सीमेवर रविवारी झालेल्या भूकंपामुळे शेकडो लोकांना प्राण गमावावे लागले तर हजारो लोक गंभीर जखमी झाले. इराण- इराकच्या सीमेवर भूकंपाचे तीव्र झटके जाणवत होते, नागरिक आपले प्राण वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळत होते. बाहेर भूकंपामुळे भीतीचं वातावरण होतं, पण अशा वातावरणातही ‘रुडॉ इंग्लिश’ ऑनलाइन न्यूज चॅनेलचा वृत्तनिवेदक अत्यंत शांतपणे आपलं कर्तव्य बजावत होता. भूकंप झाला त्या सुमारास या न्यूज चॅनलवर लाईव्ह मुलाखत सुरू होती. मुलाखतीसाठी एका पाहुण्याला स्टुडिओत आमंत्रित करण्यात आलं होतं.

Video: ‘बाहुबली’प्रमाणे हत्तीच्या सोंडेवरून पाठीवर चढायला गेला आणि…

कार्यक्रम ऐन रंगात असताना दोघांनाही भूकंपाचे तीव्र झटके जाणवू लागले. दोघांच्याही मनात भीती होती पण तरीही स्टुडिओतून पळ न काढता या दोघांनी शक्य तितकं स्वत:ला शांत ठेवत कार्यक्रम सुरूच ठेवला. ‘रुडॉ इंग्लिश’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.  इराण-इराक सीमेवर १२ नोव्हेंबरला झालेल्या भूकंपाने २०७ लोकांचा मृत्यू तर सुमारे १७०० हून अधिक जण जखमी झाले. भूकंपाचा हा धक्का ७.३ रिश्टर स्केलचा असल्याचे सांगण्यात आले. भूकंपाचा केंद्रबिंदू इराकमधील हलब्जापासून ३२ किमी अंतरावर होता. इराणला यापूर्वी २००३ मध्ये भूकंपाचा तीव्र धक्का बसला होता. यामध्ये सुमारे २६ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.