काही लोकं जगण्यासाठी खातात तर काही खाण्यासाठी जगतात अशी एक म्हण आहे. मात्र खाण्याचा विषय निघाल्यावर जगभरातील लोकांचे प्रामुख्याने दोन भाग पडतात. एक म्हणजे शाकाहारी आणि दुसरी मांसांहारी. बरं केवळ गट पडतात असं नाही तर मांसांहारी असणं किंवा शाकाहारी असणं कसं चांगलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न दोन्हीकडील मंडळी करत असतात. अगदी मित्रांचा ग्रुप असो किंवा ऑनलाइन एखाद्या फोटो किंवा व्हिडीओवरील चर्चा असो सगळीकडे दोन्ही बाजूचे लोकं आपणच चांगले कसे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनामध्ये मांसांहारी विरुद्ध शाकाहारी या वादात संशोधकांनी मांसांहारी असणं अधिक फाद्याचं असतं असा कौल दिला आहे.

अमेरिकेतील अल्बामा विद्यापिठामध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये शाकाहारी किंवा व्हेगन खाण्यामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते असं दिसून आलं आहे. या संशोधनामध्ये खाण्याच्या सवयींबद्दलच्या आधीच्या एकूण 18 संशोधकांचा आधार गेण्यात आला. यामध्ये एक लाख 60 हजार 257 जणांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात या व्यक्तींच्या खाण्याच्या सवयी, ते कोणते पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात आणि त्याचा त्यांच्या मानसिक परिस्थितीवर काय परिणाम होतो याचा संबंध जोडणारी निरिक्षणं नोंदवण्यात आली. हे संशोधन क्रिटीकल रिव्ह्यू या जर्नलमध्ये छापून आलं आहे.

या अभ्यासानंतर शाकाहारी भोजन करणारे किंवा व्हेगन खाणं खाणाऱ्यांमध्ये डिप्रेशन, अस्वस्थता आणि स्वत:लाच दुखापत करुन घेण्याची वृत्ती ही जास्त प्रमाणात असल्याचे आढळून आलं. मांसांहार न करण्याचा थेट परिणाम वर्तवणुकीवर होतो असं निरिक्षण नोंदवतानाच मांसांहार न करणाऱ्या व्यक्तींची मानसिक स्थिती ही मांसाहार करणाऱ्यांपेक्षा जास्त चिंताजनक असते, असंही या अभ्यासात म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी संशोधकांनी हे प्राथमिक निष्कर्ष असून खाण्याच्या सवयी आणि मानसिक आरोग्य यांचा संबंध अधिक स्पष्टपणे उघड करणाऱ्या विषयांवर आणखीन अभ्यास करण्याची गरज आहे असंही म्हटलं आहे.

या संशोधनामध्ये सहभागी झालेले आणि अहवाल लिहिणाऱ्यांपैकी एक असणाऱ्या अल्बामा विद्यापिठातील डॉ. एडवर्ड आर्चर यांनी, “शाकाहारी किंवा व्हेगन खाण्याच्या फायदे आणि धोके याबद्दल मागील अनेक शतकांपासून मतमतांतरे आहेत. मात्र आमच्या संशोधनामध्ये मांसांहार करणाऱ्यांचे मानसिक आरोग्य अधिक चांगलं असतं असं दिसून आलं आहे,” असं म्हटलं आहे. एखाद्या ठराविक पद्धतीचे खाणं खात असताना त्याचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होईल यासंदर्भात विचार करण्याची गरज आहे, असंही या संशोधकांनी म्हटलं आहे.

मांसांहार करणाऱ्यांना ही गोष्ट जाणून नक्कीच आनंद झाला होईल की अमेरिकेतील राष्ट्रीय आरोग्य संस्थेमधील हृदयविकारांशी संबंधित समोपदेशक असणाऱ्या असीम मल्होत्रा यांनी या संशोधनाचा अहवाल ट्विट करत, “सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला मानसिक तणाव, अस्वस्थता आणि स्वत:ला दुखापत करुन घेण्याची वृत्त टाळण्यासाठी मांस खा,” असं म्हटलं आहे.


जर तुम्ही व्हेगन किंवा शाकाहारी असाल तर तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्यासाठी काही गुंतवणूक करुन ठेवली पाहिजे असा सल्लाही मल्होत्रांनी दिला आहे.