इजिप्तमधील प्रसिद्ध बेली डान्सर असणाऱ्या सामा एल-मैसी हिला सोशल मीडियावर उत्तेजित करणारा आणि अनैतिकतेला प्रोत्साहन देणारा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. रविवारी काहिरा शहरातील एका न्यायालयाने मैसी हिला दुर्व्यवहार करणे आणि लोकांना अनैतिक कामांसाठी प्रोत्साहन दिल्या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात मैसीला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि ३० हजार पौंड (अंदाजे १४ लाख रुपये) अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. एप्रिल महिन्यामध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि फोटो प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी मैसी हिला ताब्यात घेण्यात आलं होतं. मैसीच्या टिकटॉक अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे मैसीवर सार्वजनिक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना उत्तेजित केल्याचा आरोप करण्यात आल्याचे द गार्डियनने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ४२ वर्षीय मैसी हिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळू लावत आपण निर्दोष असल्याचे सांगितले. माझ्या फोनमधून कोणीतरी तो व्हिडिओ चोरला आणि माझ्या परवानगीशिवाय तो सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोप मैसी हिने केला आहे.

काहिरा येथील न्यायालयाने शनिवारी या प्रकरणासंदर्भात निर्णय देताना अनैतिकता पसरवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवलं आहे. या प्रकरणातमध्ये मैसी हिने इजिप्तमधील कुटुंब पद्धतीचे नियम आणि मूल्यांचे उल्लंघन केलं आहे असंही न्यायलयाने या प्रकरणाचा निकाल देताना म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये मैसी वरिष्ठ न्यायालयात अर्ज करणार आहे.

मैसी विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारे संसदेमधील सदस्य जॉन तलाट यांनी या प्रकरणासंदर्भात बोलताना, “स्वातंत्र्य आणि लबाडी यामध्ये खूप मोठा फरक आहे. मैसी आणि इतर महिला सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन कौटुंब व्यवस्थेविरोधात वागत होत्या. हे संविधानाच्या विरोधात आहे,” असं मत नोंदवलं.

२०१८ साली इजिप्तमधील नव्या माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार सोशल मीडियावर अकाउंट बनवून त्या मार्फत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना किमान दोन वर्षांचा तुरुंगवास आणि ३० हजार पौंड अशी शिक्षा ठोठावण्यात येते. मागील काही महिन्यांत इजिप्तमध्ये अशाप्रकारे अनेक महिलांवर कारवाई करण्यात आली आहे.