करोनाशी सुरु असणाऱ्या लढ्यामध्ये आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी पहिल्या फळीतील योद्धे म्हणून लढत आहेत. दिवस रात्र काम करणारे आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात टाकून करोनाबाधितांना वाचवण्यासाठी झटत असल्याचे चित्र दिसत आहे. या करोनायोध्यांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच आपला जीव वाचवणाऱ्यांचे आभार मानन्यासाठी अनेकजण त्यांना अगदी आगळ्यावेगळ्या पद्धतीने धन्यवाद म्हणत असल्याची काही भावनिक उदाहरणेही समोर आली आहेत. असंच काहीसं घडलं आहे एका महिला डॉक्टरबरोबर. या महिला डॉक्टरने करोनाबाधित एका वयस्कर व्यक्तीवर उपचार करुन तिला करोनामुक्त केलं. मात्र याची परतफेड म्हणून या व्यक्तीने महिला डॉक्टरला घरी पिकवलेले तांदूळ आणून दिले.

डॉक्टर उर्वी शुक्ला यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. “एक वयस्कर व्यक्ती करोनामधून पूर्णपणे बरी झाली. ही व्यक्ती १५ दिवस करोना केंद्रामध्ये दाखल होती. त्यापैकी १२ दिवस व्हेंटीलेटरवर होती. आता बरं झाल्यानंतर आम्हाला धन्यवाद म्हणण्यासाठी त्यांनी आमच्या टीममधील प्रत्येकाला घरी पिकवलेल्या तांदळाची पाकिटं आणून दिली आहेत,” असं शुक्ला यांनी म्हटलं आहे. या ट्विटमध्ये शुक्ला यांनी तांदळाच्या पाकिटाचा फोटोही ट्विट केला आहे. रुग्णाने दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे शुक्ला भारावून गेल्या आहेत. त्यांनी आम्ही या कुटुंबाचे आभारी आहोत असंही ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झालं आहे. तीन हजार ३०० हून अधिक जणांनी ते लाईक केलं आहे. तर ५०० हून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे. अनेकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. त्यांच्या भावनांचा मान ठेवायला हवा. हा केवळ तांदूळ नसून मनापासून दिलेला आशीर्वाद आहे. स्वत:च्या कष्टाचे पीक त्यांनी तुम्हाला दिलं आहे. तुम्ही पोस्ट केलेल्या या फोटोसाठी धन्यवाद. तुमचे चांगले काम असेच सुरु ठेवा, असं एकाने म्हटलं आहे. तर अन्य एका युझरने तांदूळ नाही अक्षदा म्हणा. तुमच्यासारख्या डॉक्टर्सला सलाम, असं म्हटलं आहे. “हे खूप छान आहे. वाचून डोळ्यात एकदम पाणी आलं. त्या दिवशी तुम्हाला काय वाटलं असेल याचा विचार करु शकते,” असं दुसऱ्या एका युझरने म्हटलं आहे तर अन्य एकाने, “सर्वोत्तम गोष्ट आहे ही. स्वत:चं कष्ट आणि घाम गाळून पिकवलेलं पिक तुम्हाला दिलं त्यांनी,” असं म्हटलं आहे.