हत्तीचं बळ किती, हे वेगळं सांगायला नको. एकदा का हा प्राणी चिडला की मोठ मोठाले वृक्ष उन्मळून कुठच्या कुठे भिरकवावून देईल याचा नेम नाही. मग त्याच्या ताकदीपुढे गाड्या तर काहीच नाही. आपल्या पायानं सहज गाड्यांचा तो चेंदामेंदा करू शकतो. असे कितीतरी अंगावर काटा आणणारे व्हिडिओ आपण पाहिले असतील. नुकताच चीनमधल्या वनविभागानं हत्तीच्या हल्ल्याचा एक व्हिडिओ जारी केला आहे.

दक्षिण चीनमधला हा व्हिडिओ असून एका मदमस्त हत्तीनं रस्त्यात धुमाकूळ घातल्याचं या व्हिडिओमधून दिसत आहे. हत्तीनं रस्त्यात असलेली बस आपल्या ताकदीनं उलटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसमध्ये इतर प्रवाशी नसल्यानं अनर्थ टळला. पण, बसमध्ये चालक मात्र होता. हत्तीच्या आघातानं बसच्या काचेलाही तडे गेले. हा चालक जीव मुठीत घेऊन गाडीच्या आतमध्ये बसून होता. बराच वेळ बसशी खेळून झाल्यानंतर या हत्तीनं आपला मोर्चा रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या छोट्या ट्रककडे वळवला. आपल्या सोंडेतील अफाट ताकदीनं त्यानं ट्रक उलटा करून रस्त्यात हैदोस घातला. रस्त्याच्या कडेला असलेले लोक हतबल होऊन हत्तीचा हैदोस पाहत होते. पुढचे तासभर तरी हत्तीचा धुमाकूळ रस्त्यात चालला होता, त्यानंतर हा हत्ती शांतपणे जंगलात निघून गेला.