20 November 2019

News Flash

56 टक्के उच्चभ्रू तरूणींना हवा विदेशी दादला

यामध्ये 5 प्रमुख शहरांमधील नोंदणींचा विचार करण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

लग्नाबद्दल प्रत्येकाच्याच काही ना काही अपेक्षा असतात. अनेकदा बेवसाइटवर नोंदवलेल्या मुला मुलींच्या अपेक्षांची यादी आपल्याला दिसते. काही मुला मुलींना परदेशात मोठ्या पगारावर काम करणारा नवरा किंवा बायको हवी असते, तर काहींना स्वत:चा व्यवसाय किंवा उच्च पदस्थ मुलगा किंवा मुलगी आपली जोडीदार म्हणून हवी असते. एलाइट मॅट्रीमनी या भारत मॅट्रीमोनीच्या वेबसाइटने नुकताच भारतातील उच्चभ्रू तरूण तरूणींना आपला जोडीदार कसा असावा यासंदर्भातील एक निष्कर्ष समोर आणला आहे. यामध्ये जवळपास दीड लाख लोकांच्या अपेक्षांबाबत देण्यात आलेल्या माहितीचा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने आपला जोडीदार निवडताना देण्यात येणारी प्राथमिकता आणि अन्य बाबीचा विचार करण्यात आला आणि यातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. तब्बल 56 टक्के उच्चभ्रू तरूणींना विदेशी जोडीदार हवा असल्याची माहिती यातून समोर आली आहे.

दरम्यान, यामध्ये 5 प्रमुख शहरांमधील नोंदणींचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादसारख्या शहरांचा समावेश आहे. यावेळी करण्यात आलेल्या अभ्यासातून काही रंजक माहिती समोर आली आहे. आपल्यासाठी जोडीदार शोधणाऱ्यांपैकी 64 टक्के महिला या 18 आणि 27 तर 70 टक्के पुरूष हे 28 ते 37 या वयोगटातील असल्याचे समोर आले आहे.

तर वेबसाइटवर नोंदणी करण्यात आलेल्यांपैकी 6 टक्के सदस्य हार्वर्ड स्कूल ऑफ बिझिनेस, स्टॅनफोर्ड, प्रिन्सटन, येल, एमआयटी, कॉर्नेल, शिकागो बूथ, केलॉग, व्हार्टन, डार्टमाउथ, एनयूएस, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, लंडन स्कूल ऑफ बिझिनेस, इन्सियाड आणि एचईसी पॅरिस यांसारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठीत संस्थामधील उच्चशिक्षित आहेत. तर काही आयटीएस, आयआयटी, आयआयएम, आयएसबी, एक्सएलआरआय, एसपी जैन, एम्स, नॅशनल लॉ स्कुल आणि इन्स्ट्रीट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियामधील उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 60 टक्के सदस्यांनी आपली प्रोफाइल स्वत: तर 40 टक्के सदस्यांनी आपल्या भावंडांच्या किंवा आई वडिलांच्या मदतीने प्रोफाइल तयार केली आहे. नोंदणी केलेल्यांपैकी 56 टक्के महिला आणि 52 टक्के पुरूषांना आपला जोडीदार हा परदेशात असावा असे वाटते. तर अमेरिका, युनाटेड अरब अमिराती आणि कॅनडा सारख्या देशांना अनेकांनी प्राधान्य दिल्याचे समोर आले आहे.

33 टक्के महिला आणि 50 टक्के पुरूषांना आपला जोडीदार कमीतकमी मास्टर्स किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षित असावा, असे वाटत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर 8 टक्के महिलांना आणि 9 टक्के पुरूषांना आपला जोडीदार आपल्या जातीबाहेरील असाला असे वाटत आहे. दरम्यान, हिंदी, गुजराती, बंगाली, तेलुगू आणि तामिळ भाषिकांनी सर्वाधिक नोंदणी केल्याचेही समोर आले आहे. तसेच व्यावसायिक, बँकर्स, उद्योजक आणि डॉक्टरांनी सर्वाधिक नोंदणी केल्याचेही एलाइट मॅट्रिमनीने दिलेल्या माहितीतून समोर आले आहे.

First Published on July 9, 2019 5:20 pm

Web Title: elite matrimoney 56 percent elite girls looking for a partner outside india jud 87
Just Now!
X