25 April 2019

News Flash

एक वडापाव मदतीसाठी!, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर वडापाव विक्रेत्याचा आगळावेगळा उपक्रम

कुटुंबाचा एकमेव आधार तो होता.

मंगेश अहिवळे हे गेल्या काही वर्षांपासून एल्फिन्स्टन परिसरात वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात.

अचानक आलेला पाऊस आणि एक अफवा यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरी घडली. यामध्ये २३ जणांचा बळी गेला, तर ३८ जण जखमी झाले. जे काही त्या दिवशी घडले ते खूपच वाईट होते. या दुर्घटनेत कोणी आई गमावली, तर कोणी बाबा, तर कोणी मुलगी. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत हळदणकर कुटुंबाने आपला २० वर्षांचा मुलगा गमावला. मयुरेशच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यासाठी मयुरेश धडपडत होता. कुटुंबाचा एकमेव आधार तो होता.

या दुर्घटनेनंतर सरकारने मृत व्यक्तींच्या कुटुंबाला आर्थिक मदत घोषित केली. ही मदत त्या कुटुंबापर्यंत पोहोचेल न पोहोचेल ही दूरची गोष्ट. पण त्यांच्या कुटुंबाला आपल्यापरिने मदत करण्यसाठी एल्फिन्स्टन परिसरात राहणारे वडापाव विक्रेते मंगेश अहिवळे पुढे आले आहेत. वडापाव विकून त्यांना जे पैसे मिळतील त्याची रोख रक्कम हळदणकर कुटुंबाला ते मदत म्हणून देणार आहेत.

वाचा : या फोटोला ‘अप्रतिम’ म्हणताय?, त्याआधी सत्य तरी जाणून घ्या!

मंगेश अहिवळे हे गेल्या काही वर्षांपासून एल्फिन्स्टन परिसरात वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून त्यांचे कुटुंब चालतं. वडापावचा व्यवसाय करताना ते समाजसेवा देखील करतात. याआधी त्यांनी दृष्काळग्रस्तांनादेखील मदत केली होती. मयुरेशच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याचं समजल्यावर मंगेश यांनी या कुटुंबाला मदत करण्याचं ठरवलं. यासाठी १४ ऑक्टोबर रोजी ते फक्त ५ रुपयांना वडापाव विकणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत वडापावची विक्री करुन जी कमाई होईल ती सारी ते मयुरेशच्या वडिलांच्या स्वाधीन करणार आहेत.

‘मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्यामुळे माझ्या कुटंबाचं पोट भरण्याबरोबरच मी समाजसेवेला देखील हातभार लावतो. समाजातील चांगल्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी समाजसेवेला सुरूवात केली. उद्या माझा आदर्श इतर लोक घेतील आणि समाजसेवेचे हे व्रत सुरूच राहिल. मी जेव्हा हळदणकर कुटुंबाची भेट घेतली तेव्हा मयुरेश त्यांचा एकमेव आधार असल्याचं मला समजलं, त्यामुळे मी या कुटुंबाला मदत करण्याचं ठरवलं’ अशी प्रतिक्रिया मंगेश यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली.  एल्फिन्स्टन परिसरातील स्वामी समर्थ मठाजवळ त्यांची वडापावची गाडी आहे. तिथे हा उपक्रम राबवण्यात येईल. यासाठी सगळ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.

वाचा : लोकांच्या बेजबाबदार वागण्यापुढे पोलिसाने हात टेकले!

प्रतिक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@loksatta.com

First Published on October 12, 2017 9:15 am

Web Title: elphinstone stampede vadapav seller mangesh ahiwale help mayuresh haldankar family who died in stampede