जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला असून संपूर्ण जग या विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी लढताना दिसत आहे. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये अनेक देशांनी वेळोवेळी लॉकडाउनचा कालावधी वाढवत नागरिकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलं आहे. मात्र असं असतानाच आता काही देशांमध्ये करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर तेथील एक एक सेवा हळू हळू सुरु करण्यात आली आहे. करोनाने थैमान घातलेल्या फ्रान्समध्येही अनेक सेवा टप्प्याटप्प्यात सुरु करण्यात येत आहेत. नुकतचं येथील हॉटेल आणि कॅफे शॉप्सला काही निर्बंधांचे पालन करुन पुन्हा व्यवसाय सुरु करण्याचा परवानगी देण्यात आली आहे. याचसंदर्भातील एक फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झाला आहे.

चीननंतर युरोपीयन देशांमध्ये करोनाने थैमान घातलं. यामध्ये इटली, स्पेन आणि फ्रान्सचा करोनाचा सर्वाधिक फटका बसला. या सर्वांमधून सावरत आता या देशांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी एक एक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत आठवडाभरापूर्वी फ्रान्समधील कॅफेंना सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता, मर्यादित ग्राहक संख्या यासारखे काही निर्बंध घालून परवानगी देण्यात आली. त्यानंतरच एका कॅफे मालकाने भन्नाट शक्कल लावत करोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी थेट टेडी बेअर्सची मदत घेतल्याचे समोर आलं आहे.

तीन हजारहून अधिक जणांनी शेअर केलेल्या आणि ११ हजारांहून अधिक जणांनी लाइक केलेल्या या फोटोमध्ये फ्रान्समधील पॅरिस येथील एक कॅफे दिसत आहेत. कॅफेसमोरील फुटफाथवजा जागेवर मांडण्यात आलेल्या टेबलांवर ग्राहकांनी एकमेकांपासून सोशल डिस्टन्सिंग ठेवावे म्हणून येथे चक्क मोठ्या आकाराचे टेडी बेअर ठेवण्यात आले आहेत. अगदी एखाद्या व्यक्तीच्या आकारेच चॉकलेटी रंगाचे हे मोठे डेटी बेअर खुर्च्यांवर ठेवण्यात आल्याने ग्राहकांना उरलेल्या खुर्च्यांवरच बसावे लागत आहे. त्यामुळे आपसुकपणे दोन व्यक्तींमध्ये अंतर राखलं जातं आहे. करोना काळामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी कॅफे मालकाने वापरलेली ही शक्कल नेटकऱ्यांना खूपच आवडली आहे. “बेअर्सच्या मदतीने सोशल डिस्टन्सींगचा प्रयोग” अशा कॅप्शनसहीत हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

जगभरातील वेगवगेळ्या देशामध्ये हॉटेल आणि कॅफे सुरु झाली असून नव्या नियमांप्रमाणे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. यामध्ये अगदी काचांचे पार्टीशन टाकण्यापासून ते मर्यादित ग्राहकांना प्रवेश देणे, टेबल्सची संख्या कमी करणे, शरीराचे तापमान मोजूनच प्रवेश देणे अशा अनेक गोष्टींचा वापर केला जात आहे. मात्र पॅरिसमधील ही कल्पना अगदीच हटके आणि गोंडस असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.