हात पाय धड असलेल्या एखाद्या भिका-याने आपल्या समोर हात पसरवले तर आपली प्रतिक्रिया नकळत एकच असते ती म्हणजे धडधाकड तर दिसत आहे भीक मागण्यापेक्षा काम का नाही करत हे लोक? पण, त्यांना काम देण्याचे आपल्यापैकी किती जण प्रामाणिक प्रयत्न करतात? राजस्थानमधला एक तरूण असा आहे ज्याने या भिका-यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले आहे. त्याने नवा व्यवसाय सुरू केला आहे आणि रस्त्यावर राहणा-या भिका-यांनाच तो नोकरी देत आहे. यामुळे त्यांचे भीक मागणेही बंद होईल आणि पूर्वीपेक्षा त्यांचे आयुष्यही नक्कीच सुधारेल एवढा साधा उद्देश त्याचा आहे.

वाचा : शेती करण्यासाठी इंजिनिअरने आपली कंपनी विकली

राजस्थानमधल्या श्रीमाधोपुरमधल्या मंडरू गावात गणपत यादव हा तरूण राहतो. त्याने इंजिनिअरिंग केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला मोठ्या पगाराच्या नोक-याही आल्या पण याकडे पाठ फिरवत त्याने वेगळा उपक्रम हाती घेतला. सध्या त्याने याच परिसरातील अनेक गावामध्ये जमीनीनचे तुकडे विकत घेतले आहे. तिथे त्याला सेंद्रिय पद्धतीने शेती करायची आहे. यासाठी आपल्या शेतावर त्यांनी मजुर नेमले आहे. पण गणपतने त्यांनाच नोकरी दिली आहे जे रस्त्यावर भीक मागत जीवन कंठत आहे. राजस्थान पत्रिकेला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितले की मला भिका-यांना स्वावलंबी बनवायचे आहे. लहानपणापासूनच मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते. मी योग्य संधीच्या शोधात होतो. मी शेती व्यवसाय करायचे ठरवले. त्यामुळे रस्त्यावर भीक मागणा-या लोकांना मी माझ्या शेतात काम देण्याचे ठरवले.

वाचा : भारतीय वंशाच्या उद्योजकाने बनवल्या पाण्यात विरघळणा-या प्लास्टिक पिशव्या

गणपतने सेंद्रीय पद्धतीने शेती करायला सुरूवात केली. रस्त्यावर भिक मागणारे जवळपास १०० लोक आज त्याच्या शेतावर काम करतात. शेतावर काम करण्याआधी गणपतने या सगळ्यांना शेतीविषयी प्रशिक्षण दिले. आपल्या शेतात ते भाजी, शेंगदाणे असे अनेक उत्पन्न घेतात. गणपतचे अनेक मित्र इंजिनिअर आहेत त्यांना परदेशात गडगंज पगाराची नोकरी आहे. पण पैसे कमावून श्रीमंत होण्यापेक्षा त्याला भिका-यांचे जीवन सुधारण्यात अधिक आनंद वाटतो. त्याच्यासोबत काम करणा-या अनेक भिका-यांचे जीवन आता सुधारले आहे.