खड्डा चुकवताना वडिलांच्या दुचाकीवरुन पडून एका २३ वर्षीय इंजिनिअर तरुणीचा मृत्यू झाला. महाराष्ट्राप्रमाणे शेजारच्या कर्नाटकातही खड्डे एक मोठी समस्या आहे. चिक्कमंगळुरु-कादूर रोडवर रविवारी ही दुर्देवी घटना घडली. सिंधुजा के असे मृत मुलीचे नाव असून तिने कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगमध्ये नुकतीच पदवी घेतली होती. सिंधुजाला बंगळुरु येथील एका कंपनीत नोकरी लागली होती.

त्यासंबंधी कामासाठीच वडिलांसोबत जात असताना खड्ड्यांमुळे दुचाकीवरुन पडून सिंधुजाचा मृत्यू झाला. जॉईनिंग प्रोसेसचा भाग म्हणून सिंधूजा पासपोर्टच्या कामासाठी जात असताना ही दुर्देवी घटना घडली. यात धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी सिंधूजाच्या वडिलांविरोधातच बेदरकारपण दुचाकी चालवल्याचा गुन्हा नोंदवला. त्यामुळे स्थानिकांनी मोठया प्रमाणात आंदोलन केले. स्थानिकांनी ‘खड्डे भरा, जीव वाचवा’ हे ऑनलाइन कॅम्पेन सुरु केले.

रविवारी दुपारी सिंधुजा आणि तिचे वडिल कुमारप्पा पासपोर्ट व्हेरीफिकेशनच्या प्रोसेसाठी पोलीस स्टेशनमध्ये निघालेले असताना हा अपघात घडला. ५२ वर्षीय कुमारअप्पा यांनी खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करताना ब्रेक मारला. त्यावेळी दोघेही बाईकवरुन खाली पडले. यामध्ये सिंधूजा गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात नेले त्यावेळी डॉक्टरांनी तिला हसन येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. पण दुसऱ्या रुग्णालयात नेण्याआधीच सिंधूजाचा मृत्यू झाला अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.