इंग्लंडच्या फिरकीपटूने लंडनचा महापौर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फिरकीपटू माँटी पानेसारने आपल्याला लंडनचा महापौर बनण्याची इच्छा असल्याचे म्हटलं आहे. इंग्लंडचे महापौर सादिक खान यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे या महापौरपदाच्या स्पर्धेत आपल्याला उतरायला आवडेल असं मॉन्टी पानेसार म्हणाला.

“मी लंडनचा रहिवासी आहे आणि राजकारणाची मला आवड आहे. जर मी निवडणूक लढवली, तर तुम्ही मला मत द्याल का?” असा सवाल मॉन्टी पानेसारने केला. लव स्पोर्ट्स रेडिओवरील एका कार्यक्रमादरम्यान तो उपस्थित होता. लंडनमध्ये 7 मे 2020 रोजी महापौरपदासाठी निवडणुका पार पडणार आहे. तसंच यावेळी लंडन असेंबलीच्या निवडणुकाही पार पडणार आहेत. सध्या लेबर पार्टीच्या सादिक खान यांच्या खांद्यावर महापौरपदाची जबाबदारी आहे. ते 2016 मध्ये महापौरपदी विराजमान झाले होते.

दुसरीकडे मॉन्टी पानेसारने पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. “मला पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्याची इच्छा आहे. सध्या मी माझ्या फिटनेसवरही काम करत आहे. काऊंटी क्रिकेटमध्ये मला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. मी लंडनमध्येच राहतो हळूहळू राजकारणातही प्रवेश करण्याचीही इच्छा आहे. लंडनच्या महापौर बनण्याची ही योग्य संधी आहे,” असंही तो यावेळी म्हणाला. मॉन्टी पानेसारने इंग्लंडसाठी 50 कसोटी सामन्यांमध्ये 167 विकेट्स घेतल्या आहेत. तर 26 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या नावे 24 विकेट्स आहेतत. 2006 मध्ये नागपूरमध्ये भारताविरोधात कसोटी सामन्यातून त्यानं पदार्पण केलं होतं.