News Flash

Video : …अन् युरो कपच्या सामन्याआधीच स्टेडियमबाहेर इंग्लंड समर्थकांमध्ये झाला फ्री स्टाइल ‘राडा’

व्हायरल व्हिडीओमध्ये इंग्लंडचे समर्थक एकमेकांच्या पायात पाय घालून समोरची व्यक्ती पडल्यावर त्याला मारहाण करत असल्याची दृष्ये कॅमेरात कैद झालीयत

England Fans Fight Each Other Outside Wembley
या गोंधळाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या युरो कप २०२० च्या अटीतटीच्या महामुकाबल्यात इटलीने इंग्लंडवर सरशी साधत यूरो कप २०२० च्या विजेतेपदाचा मान पटकावला. होम का रोम, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असलेल्या चाहत्यांना वेम्बलीवर पेनल्टी शूटआउटचा थरार पाहायला मिळाला. स्पर्धेतील सर्वात जलद गोल करत यजमान संघाने दणदणीत सुरुवात केली मात्र सामन्याचा शेवट त्यांच्यासाठी कडू ठरला. पहिल्या सत्रात इंग्लंडने एक तर दुसऱ्या सत्रात इटलीने गोल करत बरोबरी साधली होती. ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही बरोबरीत असणाऱ्या सामन्याचा निकाल लागला नाही. अखेर पेनल्टी शू़टआउटमध्ये जेडन सँचो, साका आणि रॅशफोर्ड हे खेळाडू इंग्लंडसाठी गोल करण्यात अपयशी ठरले. तब्बल ५५ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचे इंग्लंडचे स्वप्न हे धूळीस मिळाले आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडचा पराभव तर झालाच शिवाय सामन्याआधी इंग्लंडच्या समर्थकांमध्ये मैदानाबाहेर झालेले राडेही चर्चेत आहेत.

इंग्लंड आणि इटलीदरम्यानचा अंतिम सामना सुरु होण्याच्या काही तास आधीपासूनच वेम्बली स्डेडियमबाहेर इंग्लंडचे समर्थक एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं चित्र दिसून आलं. मैदानाबाहेर प्रवेशद्वाराजवळ नक्की हा गोंधळ कशामुळे उडाला आणि इंग्लंडचे समर्थक एकमेकांना का हणामारी करु लागले याची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. चहात्यांच्या दोन गटामध्ये जोरदार हणामारी झाली. बाचाबाचीपासून सुरुवात झाल्यानंतर एकमेकांना पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यापर्यंत हे प्रकरण गेलं. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर ताबा मिळवल्याचं वृत्त मिरर या वेबसाईटने दिलं आहे. मैदानामध्ये प्रवेश देण्यात आल्यानंतर मुख्य आसनांकडे जाण्याआधीही मधल्या लॉबीमध्ये चाहत्यांच्या दोन गटांमध्ये तुफान हणामारी आणि शिवागाळ झाल्याचं पहायला मिळालं. काही फुटबॉल चाहते तिकीट नसताना मैदानात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याने हा गोंधळ उडाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सुरक्षा यंत्रणांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही

५५ वर्षानंतर इंग्लंड युरो कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करणार या अपेक्षेने हजारो चहाजे वेम्बली स्टेडियमच्या बाहेर जमा झाले होते. बॉक्स पार्कच्या बाजूने मैदानात प्रवेश दिला जात असतानाच अचानक दोन गटांमध्ये हणामारी सुरु झाली आणि सर्वजण इकडे तिकडे पळू लागले. ९० हजार प्रेक्षकांची आसन क्षमता असणाऱ्या वेम्बली स्टेडियमबाहेर यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. या गोंधळाच्या व्हायरल व्हिडीओंमध्ये इंग्लंडचे समर्थक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये इंग्लंडचे समर्थक एकमेकांच्या पायात पाय घालून समोरची व्यक्ती पडल्यावर त्याला मारहाण करत असल्याची दृष्ये कॅमेरात कैद झालीयत. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा वाद लवकर निवळला आणि पुन्हा रांगा लावून तिकीट असणाऱ्या प्रेक्षकांना मैदानामध्ये प्रवेश देण्यात आला.

इटलीने अजिंक्य राहत युरो कप २०२० वर आपलं नाव कोरलं. यूरो कप २०२० स्पर्धेत इटलीने एकही सामना गमावला नाही. साखळी फेरीत इटलीने टर्की, स्वित्झर्लंड आणि वेल्सला पराभूत करत बाद फेरीत धडक मारली होती. त्यानंतर बाद फेरीत ऑस्ट्रियाचा २-१ ने पराभव केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा २-१ ने धुव्वा उडवला. तर उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीने स्पेनचा ४-२ ने पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2021 11:35 am

Web Title: england fans fight each other outside wembley ahead of euro 2020 final vs italy scsg 91
टॅग : Euro Cup 2020
Next Stories
1 Viral Video: रशियात कुत्र्यांना युद्धासाठी खास पॅराशूट प्रशिक्षण
2 अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल जुलै २६ पासून: जाणून घ्या काय आहेत खास ऑफर्स!
3 PUBG खेळायला पालक मोबाइल देत नसल्याने तीन मुलं घर सोडून पैसे कमवण्यासाठी पळून गेली; पोलीसही चक्रावले
Just Now!
X