जीन्सचा क्रेझ किती आहे हे वेगळं सांगायला नको. आरामदायी किंवा ज्यात सहज वावरता येतील असे कपडे म्हणून जीन्सला प्राधान्य आहे. विशेष म्हणजे इतर कपड्यांसारखे इस्त्री करण्याचे किंवा वारंवार धुण्याचे कष्ट जीन्ससाठी घ्यावे लागत नाही. त्यामुळे जीन्सला सर्वाधिक पसंती असते. हल्ली फॅशन ट्रेंड्सप्रमाणे वेगवेगळ्या जीन्स बाजारात उपलब्ध आहेत.

पण सध्या एका भलत्याच जीन्स ट्रेंडनं फॅशनविश्वात धुमाकूळ घातलाय. ‘चार्मर’ या लॉस एन्जलिसमधील डेनीम ब्रँडनं ‘Extreme Cut Out’ ‘एक्स्ट्रीम कट आऊट’ जीन्स बाजारात आणली आहे. आता ही जिन्स आहे की चिंध्या हे ती तयार करणाऱ्यालाच ठाऊक, पण ‘चार्मर’चं हे कलेक्शन मात्र जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

याला जीन्स म्हणायचं का असा प्रश्न अनेकांसमोर पडला आहे. असून नसून सारखीच अशा प्रकारातल्या या एक्स्ट्रीम कट आऊटची किंमतही जबरदस्त धक्का देणारी आहे. या जीन्सची किंमत १६८ डॉलर म्हणजे जवळपास ११ हजार रुपयांहूनही अधिक आहे. आता या जीन्सकडे पाहून त्याची किंमत ११ हजार का ठेवली आहे, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तेव्हा त्यांची ही जाहिरात पाहून हसावं की रडावं असं अनेकांचं झालंय.