06 December 2019

News Flash

FaceApp च्या अटी आणि नियम वाचून तुम्हाला धक्काच बसेल

अनेक युझर्सने या अॅपच्या अटी आणि नियम न वाचताच ते इन्स्टॉल केले आहे

फेसअॅप

सोशल नेटवर्किंगवर सध्या चर्चा आहे ती फेसअॅपची. तुमच्या फ्रेण्डलीस्टमधील मित्रांचा म्हतारपणातील अवतार दाखवणाऱ्या या अॅपची सध्या नेटकऱ्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. २०५० मध्ये एखादी व्यक्ती कशी दिसेल हे सध्याच्या फोटोंवरुन दाखवणाऱ्या या अॅपने सामन्यांपासून ते सेलिब्रिटीजलाही वेडं लावलं आहे. मात्र आता या अॅप संबंधित धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे अॅप्लिकेशन इन्स्टॉल करणाऱ्या अनेकांचे फोटो आणि मोबाइलमधील डेटा कंपनीच्या मालकीचा झाल्याचे वृत्त अमेरिकेतील अनेक वृत्तपत्रांनी छापले आहे. तसेच या अॅप्लिकेशनच्या अटी आणि नियमही खूपच धक्कादायक असल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

‘फोर्ब्स’ने दिलेल्या वृत्तानुसार १५ कोटीहून अधिक लोकांचा डेटा आता ‘फेसअॅप’ची मालक कंपनी असणाऱ्या ‘वायरलेस लॅब्स’ या रशियन कंपनीकडे आहे. मागील काही दिवसांमध्ये गुगल प्लेवरुन १० कोटी युझर्सने तर आयफोन वापरणाऱ्या ५० कोटी युझर्सने हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्याचे ‘फोर्ब्स’ने म्हटले आहे. या अॅप्लिकेशनमधील सर्वात लोकप्रिय फिल्टर असणाऱ्या ‘ओल्ड एज फिल्टर’च्या माध्यमातून डेटा चोरी होत असल्याचे सायबर तज्ज्ञांनी म्हटले आहे. युझर्सच्या मोबाइलमधील खासगी माहिती आणि ओळख सांगणारा सर्व डेटा या मोफत मिळणाऱ्या अॅप आणि फिल्टरच्या माध्यमातून कंपनीच्या सर्व्हरवर अपलोड झाला असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. काही वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अॅप्लिकेशनच्या नियम आणि अटींमुळे अॅप इन्स्टॉल करताना अनेक युझर्सने त्यांचा डेटा कंपनीला दिला आहे. युझर्सने अॅप्लिकेशन इन्स्टॉल करताना दिलेल्या परवाणगीनुसार युझर्सच्या डेटामध्ये कंपनी फेरफार शकते, पुन:निर्मित करु शकते किंवा तो छापण्यासाठीही वापरु शकते असे नमूद करण्यात आले आहे.

या अॅपमधील सर्वात धक्कादायक नियम म्हणजे युझर्सची खाजगी माहिती कंपनीला कधीही, कशीही आणि कुठेही वापरण्याची परवाणगी देण्यासंदर्भात आहे. या नियमानुसार, ‘तुम्ही फेसअॅपला परवाणगी देत आहात. तुमच्या माहितीचा वापर, पुनरुत्पादन, सुधारणा, प्रकाशित करण्याचे हक्क, भाषांतर करणे, कोठेही हा डेटा वितरित करणे, सार्वजनिकपणे प्रदर्शन करणे हे सर्व हक्क कंपनीकडे असतील. युझर्सचे नाव, युझरनेम किंवा सोशल नेटवर्किंगवर त्यांची आवड निवड यासंदर्भातील सर्व माहिती सध्या अस्तित्वात असणाऱ्या किंवा भविष्यात निर्माण होणाऱ्या कोणत्या प्रकराच्या माध्यमांमध्ये, वाहिन्यांवर वापरण्याचा हक्क कंपनीकडे आहे. ही माहिती वापरण्यासाठी कंपनी युझर्सला कोणत्याप्रकराचे मानधन किंवा मोबदला देणार नाही. हे अॅप वापरुन युझर्स जेव्हा एखादी पोस्ट तयार करतात तेव्हा त्यांची माहिती (युझरनेम, लोकेशन आणि प्रोफाइल फोटो) कंपनीकडे आहे आणि ही माहिती सार्वजनिकपणे सर्वांना उपलब्ध होऊ शकते याची युझरला कल्पना आहे असा त्याचा अर्थ होतो.’

पीटर कोस्तांडीयो या टेक ब्लॉगरने फेसअॅप आणि त्याच्या माध्यमातून होणाऱ्या डेटा चोरीबद्दल ब्लॉग लिहिला आहे. ‘जेव्हा तुम्ही फेसअॅप डाऊलोड करता तेव्हा तुम्ही अॅपची मालकी असणाऱ्या रशियन कंपनीला तुम्ही अपलोड केलेला फोटो कसाही कधीही वापरण्याची परवाणगी देता. तुमच्या चेहऱ्यांचे फोटो रशियामधील एखाद्या संशोधन केंद्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फेशीयल अल्गोरिदम शिकण्यासाठी वापरले जात असतील. तुम्ही एकदा हे अॅप इन्स्टॉल करुन आपली प्रोफाइल तयार केली तर तुम्ही ती कधीच डिलीट करु शकत नाही. ती प्रोफाइल डिलीट करण्याचा हक्क केवळ वायरलेस लॅब या कंपनीकडे आहे,’ असं पीटर आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतो.

‘या अॅप्लिकेशनमध्ये एवढ्या त्रुटी आहेत की ही कंपनी मोबाइलमधील कॅमेरा हॅक करुन युझर्सची सर्व माहिती काढू शकते. असं केल्यास ते जगभरातील युझर्सचा डेटाबेस तयार करु शकतात. या डेटाबेसमध्ये प्रत्येक युझरची इतकी माहिती असेल की त्याचा आपण विचारही करु शकत नाही. हे असं घडूच शकतं याची शक्यता नाकारता येत नाही,’ असं सायबर सुरक्षा तज्ज्ञ असणारे एरियल हॉचस्ताद यांनी ‘डेली मेल’ या वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केली आहे.

फेसबुकचेही नियम असेच…

एकीकडे जगभरातील अनेक सायबर सुरक्षा तज्ज्ञ या अॅपच्या माध्यमातून डेटा चोरीचा आरोप करत असताना दुसरीकडे काही तज्ज्ञांनी फेसअॅप इतर अॅपसारखेच असल्याचे म्हटले आहे. फेसअॅपचे नियम आणि अटी फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंग अॅपसारख्याच असल्याचे म्हटले आहे. ‘लोक अनेक अॅप्लिकेशन्सला त्यांचे फोटो आणि माहिती वापरण्याची परवाणगी देतात. हे अॅप केवळ रशियातील असल्याने एवढी चर्चा होत आहे,’ असं मत ख्रिश्चन बेनॅन या सायबर सुरक्षातज्ज्ञाने व्यक्त केले आहे. फेसबुक आणि फेसअॅपच्या नियम आणि अटी सारख्याच असल्याचेही अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे. ‘जेव्हा तुम्ही बौद्धिक संपत्ती अधिकार (इंटलेकच्युअल प्रॉपर्टी राईट्स) (उदा: फोटो किंवा व्हिडिओ) वर किंवा आमच्या उत्पादनांच्या संबंधातील माहिती पोस्ट करता किंवा अपलोड करता तेव्हा तुम्ही आम्हाला ती माहिती एक हस्तांतरणीय, परवाणगी सहीत, भरपाई न देता जगभरात कुठेही वापरता, वितरीत करता, सुधारणा करण्याचा हक्कासहीत कॉपी करुन सार्वजनिकपणे प्रदर्शीत करण्याचा किंवा भाषांतर करण्याचा हक्क देता,’ असं फेसबुकच्या अटी आणि नियम सांगतात.

First Published on July 19, 2019 1:53 pm

Web Title: faceapps terms conditions are worst software now owns private data of more than 150 million people scsg 91
Just Now!
X