सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम असून अनेकदा त्याचा चांगल्या गोष्टींसाठीही वापर करता येऊ शकतो. पश्चिम बंगालमधील गौरव अधिकारी या तरुणाने याच सोशल मीडियाचा वापर आपल्या आईला जोडीदार शोधण्यासाठी केला आहे. गौरव अधिकारी याची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौरव अधिकारी याने फेसबुक पोस्टमध्ये आपल्या आईसाठी योग्य वर शोधत असल्याचं सांगितलं आहे. यावेळी गौरवने आपला आईसोबतचा फोटो पोस्टसोबत शेअर केला आहे. गौरव पश्चिम बंगालमधील फ्रेंच कॉलनी येथे वास्तव्यास आहे.

गौरव याच्या आईचं वय सध्या ४५ वर्ष असून वडिलांचं पाच वर्षांपुर्वी निधन झालं आहे. गौरव याने फेसबुक पोस्टमध्ये सांगितल्यानुसार, आपण कामावर गेल्यानंतर अनेकदा आईला घरात एकटं राहावं लागतं. दरम्यान गौरव याच्या फेसबुक पोस्टवर नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव होत असून, अनेकजण ही पोस्ट आणि फोटो शेअर करत आहेत.

१० नोव्हेंबर रोजी गौरव याने आपल्या आईसोबतचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने, आईसाठी सुयोग्य वर शोधत आहोत असं लिहिलं आहे. काही वेळातच या पोस्टवर नेटिझन्स तुटून पडले आणि गौरवचं आपल्या आईवरील प्रेम आणि काळजीबद्दल कौतुक केलं.

गौरव याच्यानुसार, आईच्या आयुष्यात जी कोणी व्यक्ती येईल ती स्वावलंबी हवी. गौरवच्या आईला वाचणाची आणि संगीताची आवड आहे. गौरव याच्या म्हणण्यानुसार, तिची आवड तिला व्यस्त ठेवतात, पण यामुळे जोडीदार नसल्याची कमतरता पूर्ण होत नाही. आपल्या आईच्या जोडीदाराने भक्कम पाठिंबा म्हणून तिच्या मागे उभं राहावं अशी गौरवची इच्छा आहे. लोक आपली खिल्ली उडवतील याची चिंता नाही. तिचा मुलगा या नात्याने ती आनंदी राहावी ही आपली जबाबदारी असल्याचं गौरवचं म्हणणं आहे.

लग्न झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या संसारात व्यस्त होऊ तेव्हा आईसोबत असण्यासाठी तसंच काळजी घेण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे अशी गौरवची इच्छा आहे. आपल्या आईला योग्य जोदीदार मिळेल अशी गौरवला आशा आहे.