सोशल मिडियावर अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी फोटो व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला असून हा फोटो आहे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा. या फोटोमध्ये अरविंद केजरीवाल हे घरातील एका झाडाला पाणी घालताना दिसत आहेत. मात्र नीट पाहिल्यास केजरीवाल हे झाडाऐवजी कुंडी खालील ट्रेमध्ये पाणी ओतताना दिसत आहेत. यावरुनच आता विरोधकांनी केजरीवाल यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

नक्की वाचा >> श्रीमंतीचा अहंकार नको म्हणून सुधा मूर्ती वर्षातून एकदा विकतात भाजी?; जाणून घ्या ‘त्या’ फोटोची गोष्ट

केजरीवाल यांच्या या फोटोवरुन ते फोटो काढण्याच्या नादात ट्रेमध्ये पाणी ओतत आहेत असा टोला विरोधकांनी लगावला आहे. “फोटोशूटच्या नादात पाणी झाडांना घालायचं आहे की ट्रेला हेच विसरले केजरीवाल. केजरीवालजी काळजी घ्या,” असं एकाने ट्विट केलं आहे.

मात्र या फोटोमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा असून केजरीवाल यांना खरोखरच ट्रेमध्येच पाणी टाकायचे होते. मुळात हा फोटो केजरीवाल यांनीच ट्विट केला आहे. दिल्ली सरकारने डेंग्यू डासांची पैदास होऊ नये यासाठी एक जनजागृती मोहिम सुरु केली आहे. याच मोहिमेअंतर्गत केजरीवाल यांनी हा फोटो पोस्ट केला होता.

१३ सप्टेंबर रोजी केजरीवाल यांनी याचसंदर्भात आपल्या घरातील वेगवगेळ्या गोष्टींमध्ये पाणी साचून राहणार नाही याबद्दल मी काळजी घेत असल्याचे सांगणारे फोटो पोस्ट केले होते. याच फोटोंमध्ये कुंडीखालील ट्रेमधील पाणी साचले असेल तर तेही स्वच्छ करायला हवे असं केजरीवाल यांनी सांगितलं होतं. “डेंग्यूविरोधातील मोहिमेचा आज दुसरा दिवसत. मी आज माझ्या घरातील वस्तूंची तपासणी केली आणि साचलेलं पाणी बदललं. यासाठी मला केवळ १० मिनिटं लागली. तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील वस्तू तपासून पाहा. डेंग्यू हरणार आणि दिल्ली पुन्हा एकदा जिंकणार,” असं केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमधील फोटोंपैकी हा एक फोटो चुकीच्या माहितीबरोबर व्हायरल होत आहे.

दिल्ली सरकारने दिल्लीतील नागरिकांना १० आठवडे प्रत्येक रविवारी सकाळी १० वाजता १० मिनिटांसाठी घरातील पाणी साचणाऱ्या जागांची पाहणी करुन तेथे डेंग्यू डासांची पैदास होणार नाही यासंदर्भात काळजी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यासाठी नियमितपणे घराची तपासणी करत जा असंही सरकारने म्हटलं आहे. यासाठी सोशल मिडियावरही  #10Hafte10Baje10Minute या हॅशटॅग अंतर्गत मोहिम राबवण्यात आली आहे.