चीनमधील निंगक्षिया ह्य़ुइ प्रांतातील मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये ‘करोना’ विषाणूचा प्रसार का झाला नाही, याचा शोध घेण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भेट दिल्याचा बनावट मजकूर समाजमाध्यमांवर सध्या फिरत आहे.

जिनपिंग यांनी २०१६ मध्ये ह्य़ुइ प्रांताला भेट दिली होती. त्या वेळी त्यांच्या दौऱ्यात त्यांनी मुस्लिम वस्त्यांना भेट दिली होती. या त्यांच्या दौऱ्याच्या चित्रफिती वापरून त्यात बदल करण्यात आला आहे आणि त्यासोबत खोटा मजकूर पसरविण्यात आला आहे. अर्थात हे सारे वर्णन बंगाली भाषेतील आहे. म्हणजे चीनमधील मुस्लिम वस्त्यांमध्ये करोना विषाणू कसा पसरला नाही वा तो पसरू नये, यासाठी मुस्लिमांनी कशी काळजी घेतली. याशिवाय त्यांची जीवनशैली कशी योग्य आहे, असा खोटा दावा या चित्रफितीसोबतच्या मजकुरात करण्यात आला आहे. खरेतर चीनमध्ये करोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर काही दिवसांतच क्षि यांच्या चीनमधील नागरिकांच्या भेटीच्या जुन्या चित्रफिती समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ करण्यात आल्या. २० फेब्रुवारी २०२० रोजी सध्या प्रसारित झालेल्या चित्रफिती समाजमाध्यमांवर दाखविण्यात आल्या होत्या.

शी जिनपिंग यांनी त्यांच्या दौऱ्यात ईशान्य चीनमधील विकसनशील असलेल्या अल्पसंख्याक आणि इतर जमातींच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकासाच्या योजना राबविण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. या त्यांच्या घोषणेला आता साधारण चार वर्षे होत आहेत. त्याचा करोना विषणू प्रसाराशी कोणताही संबंध नाही. मात्र, समाजमाध्यमांवर धार्मिक अभिनिवेशातून नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. २१ जुलै २०१६ रोजी क्षि यांनी मुस्लिम धर्मीयांच्या काही प्रतिनिधींशी चर्चा करताना दिसत आहेत.

अध्यक्षीय दौऱ्यातील तो एक भाग होता. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास न ठेवलेलाच बरा.