News Flash

खरोखर RSS च्या वयस्कर स्वयंसेवकाने करोना रुग्णासाठी बेड सोडला का?; जाणून घ्या काय घडलं?

८५ वर्षीय नारायणराव दाभाडकर यांचं करोनामुळे निधन झालं

नागपूरमधील एक घटना सध्या खूप चर्चेत आहे. ८५ वर्षीय नारायणराव दाभाडकर यांचं करोनामुळे राहत्या घरी निधन झालं. यानंतर त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे. करोना रुग्णासाठी त्यांनी बेड सोडला असं सांगितलं जात आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करत नारायणराव दाभाडकर यांनी दुसऱ्या रुग्णासाठी बेड नाकारला अन् मृत्यूला कवटाळलं अशी माहिती पोस्टमध्ये दिली आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेकजण नारायण दाभाडकर यांचा फोटो शेअर करत कौतुक करत आहेत.

शिवराज सिंग चौहान यांचं ट्विट काय?
शिवराज सिंग चौहान यांनी नारायण दाभाडकर यांचा फोटो पोस्ट केला असून लिहिलं आहे की, “मी ८५ वर्षाचा झालो आहे. संपूर्ण आयुष्य पाहिलं आहे, पण जर त्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर तिची मुलं अनाथ होतील. यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणं माझं कर्तव्य आहे” असं सांगत करोनाबाधित आरएसएस स्वयंसेवक नारायणजींनी आपला बेड त्या रुग्णाला दिला”.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “दुसऱ्या व्यक्तीच्या जीवाचं रक्षण करताना नारायणजी तीन दिवसांमध्ये जग सोडून गेले. समाज आणि राष्ट्राचे खरे सेवक असाच त्याग करतात. आपल्या सेवेला सलाम!, तुम्ही समाजासाठी प्रेरणादायी आहात”.

रुग्णालयाने काय सांगितलं आहे –
“नारायणराव दाभाडकर यांना २२ एप्रिलच्या संध्याकाळी रुग्णवाहिकेतून येथे आणण्यात आले. ते स्वत: चालत आल्याने त्यांची प्रकृती स्थिर वाटत होती. त्यांना करोनाची लक्षणे असल्याने तातडीने रुग्णालयातील आकस्मिक विभागात दाखल केले. ऑक्सिजन आणि इतर औषधोपचार सुरू झाले. रात्री ७.५५ वाजताच्या दरम्यान त्यांनी रुग्णालयात राहायचे नसल्याचं सांगत घरी जाण्याचा आग्रह धरला. तुमचे वय अधिक असून, करोनामुळे जीवाला धोका संभावतो, असं त्यांना डॉक्टरांनी सांगितले. परंतु, त्यांनी स्वत: जोखीम पत्करून रुग्णालयातून सुटी घेतली,” अशी माहिती गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शीलू चिमुरकर (गंटावार) यांनी दिली आहे.

“यावेळी त्यांनी माझी खाट दुसऱ्या रुग्णाला द्या, असे काहीही सांगितले नाही. त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना असे काही सांगितले असेल तर मला कल्पना नाही. त्यांच्या नातेवाईकांनीही मला याबाबत काहीही कळवलेले नाही,” असंही डॉ. शीलू यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा खाटांसाठी कोणताही गोंधळ सुरू नव्हता, असं तेथील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं आहे.

कुटुंबीयांनी काय सांगितलं –
“माझे वडील करोनाबाधित होते. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले त्या वेळी रुग्णालयात खाट मिळावी, म्हणून गोंधळ सुरू होता. अनेक लोक रडत होते. ते पाहून माझ्या वडिलांचे मन द्रवले. माझी स्थिती नाजूक आहे, पण मला घरी जायचं आहे. माझी खाट गरजूला उपयोगी ठरेल, असे त्यांनी सांगितले. खूप समजावूनही मला घरी घेऊन चला, असा त्यांचा आग्रह होता. घरी आल्यानंतर दीड दिवसाने त्यांनी जगाचा निरोप घेतला. आम्हाला कोणतेही भांडवल करायचं नाही. पण त्यांनी केलेला हा त्याग समाजासाठी आदर्श आहे,” अशी भावना त्यांची मुलगी आसावरी दाभाडकर-कोठीवान यांनी व्यक्त केली आहे.

जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याची टीका
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नारायणराव दाभाडकर यांच्याबाबतीत जे घडले ते सत्य आहे. माझी खाट दुसऱ्यांना द्या, मला घरी जाऊ द्या, अशी विनंती त्यांनी रुग्णालयाला केली आणि ते घरी गेले. मात्र, दाभाडकर यांच्याबाबत समाजमाध्यमावर काही लोकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे,” अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचारप्रमुख अनिल सांबरे यांनी केली आहे.

चौकशीची शक्यता
“दाभाडकर यांना इंदिरा गांधी रुग्णालयातून घरी जाऊ दिले असेल आणि त्यांच्या बाबतीत वर्तमानपत्रातील वृत्ताप्रमाणे असं काही खरंच घडलं असेल तर त्यासंदर्भात चौकशी केली जाईल. रुग्णालयातील डॉक्टरांकडूनही माहिती घेतली जाईल,” असं महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 3:37 pm

Web Title: fact check nagpur resident naraynrao dabhadkar dies after giving bed to save other corona patient sgy 87
Next Stories
1 रुग्णालयासमोर लग्नाची वरात पाहून रुग्णवाहिका चालकाने केलं असं काही; सगळेच झाले अवाक
2 पुणे पोलिसांनी घातलं कोडं…तुम्हाला सुटतंय का पाहा बरं!
3 कमिन्सकडून PM Cares साठी ३७ लाख घेताना करोना Internal Matter असल्याचं मोदी सरकार विसरलं का?
Just Now!
X