कोरोना व्हायरसने सध्या चीनसह जगभरात थैमान घातला असताना एका बातमीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. चीन सरकारने कोरोना व्हायरसची लागण झालेल्या २० हजार रुग्णांना मारण्याची परवानगी दिली असल्याचा दावा या बातमीत करण्यात आला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी चीन सरकारच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. इंडिया टुडेने या बातमीची तथ्यता तपासली असता ही बातमी ab-tc.com. या वेबसाइटने प्रसिद्ध केली असल्याचं समोर आलं. या बातमीत करण्यात आलेल्या दाव्यानुसार, चीनमधील सर्वोच्च न्यायालायने कोरोना व्हायरसची लागण झालेल्या २० हजार नागरिकांना ठार करण्याची परवानगी मागितली आहे.

बातमीच्या हेडलाइनमध्ये वेबसाइटने लिहिलं आहे की, “चीनने कोरोना व्हायरस पसरु नये यासाठी २० हजार रुग्णांना ठार करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे”. इतकंच नाही तर बातमीत त्यांनी म्हटलं आहे की, कोरोना व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी यासंबंधी परवानगी देण्याची शक्यता आहे.

फेसबुकवरही चर्चा –
एका फेसबुक युजरने ab-tc.com. च्या बातमीचा स्क्रिनशॉट फेसबुकला शेअर केला होता. यामध्ये त्यांनी बातमीत काय लिहिलं आहे याचं हिंदीत भाषांतर केलं होतं.

दावा खोटा –
इंडिया टुडेने या बातमीची तथ्यता पडताळली असता हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे. ज्या वेबसाइटच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली आहे ती पूर्णपणे संशयास्पद आहे. पण सोशल मीडियावर अनेकांनी या बातमीवर विश्वास ठेवल्याचं दिसत आहे. अनेक नेटिझन्सनी फेसबुक आणि ट्विटरवर वेबसाइटचा हवाला देत ही बातमी शेअर केली आहे.

तथ्यता पडताळण्यासाठी गुगल किवर्ड सर्च केला असता कोणत्याही विश्वसनीय सुत्राने ही बातमी दिलेली नाही. कोरोना व्हायरस जगभरात थैमान घालत असताना त्याची प्रत्येक बातमी हेडलाइन होत आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय मीडियाने इतक्या मोठ्या बातमीची दखल न घेणं शक्य नाही. यामुळे हा दावा खोटा असल्याचं सिद्ध होत आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या ताज्या वृत्तानुसार, चीनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्हायरसची लागण झालेल्या सर्व रुग्णांना कॅम्पमध्ये एकत्र करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसंच सरकारी वृत्तवाहिनी CGTN ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनामुळे ६३० जणांचा मृत्यू झाला असून ३१ हजार जणांना लागण झाली आहे. यापैकी कोणत्याही वृत्तवाहिनीने रुग्णांना ठार माऱण्याचं वृत्त दिलेलं नाही. चीनमधील सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवरही यासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

दरम्यान ज्या बेवसाइटच्या हवाल्याने वृत्त देण्यात आलं आहे, त्यांनी याआधीही अनेकदा चुकीच्या बातम्या छापल्याचं समोर आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे छेडछाड केलेले ट्विट या बेवसाइटने याआधी प्रसिद्ध केले होते.

या वेबसाइटने आपला पत्ता, शहराचं नाव, ईमेल आयडी अशी कोणताही माहिती बेवसाइटवर दिलेली नाही. एका विश्वासार्ह वेबसाइटवर अशा गोष्टींचा उल्लेख नसणे संशयास्पद आहे.

फॅक्ट चेक वेबसाइट स्नोप्सनेही हा दावा फेटाळला आहे. त्यामुळे चीन सरकारने २० हजार कोरोना रुग्णांना ठार करण्याची परवानगी मागितल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं स्पष्ट आहे.