अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्यामुळे शनिवारी रात्री उशीरा मुंबईमधील नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ यांच्याबरोबरच अभिषेक बच्चनलाही कोरनाची लागण झाली असून त्यालाही उपचारासाठी नानाटीत दाखल केलं आहे. अमिताभ आणि अभिषेक यांनी करोनावर मात करुन लवकर डिस्चार्ज घेऊन घरी यावं अशा प्रकारच्या अनेक पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट करण्यात आल्या आहेत. मात्र याच पोस्टबरोबर अमिताभ यांचे नानावटी रुग्णालयाशी आर्थिक हितसंबंध आहेत, हा रुग्णालयाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होत आहे असे काही मेसेजही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर नानावटी रुग्णालयाची मालकी असणाऱ्या रेडिअंट ग्रुपने (Radiant Group) आपली बाजू मांडणार एक पत्रक जारी केलं आहे.
व्हॉट्सअपवर सध्या एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये अमिताभ बच्चन हे रेडिअंट लाइफ केअर प्रायव्हेट लिमीटेडच्या संचालक मंडळाच्या सदस्यांपैकी एक आहेत, त्यांच्यात करोनाची लक्षणं दिसत नसून ते असिम्टोमॅटिक आहेत. नानावटीचे कौतुक करणारा व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला होता अशा मुद्द्यांचा उल्लेख आहे. याचवरुन आपली बाजू मांडताना रेडिअंटने तिन्ही मुद्दे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
नक्की पाहा >> बॉलिवूडच्या शहेनशहानं केलीय ‘या’ आजारांवर मात
कंपनीचे संचालक कोण?
कंपनीने आपल्या वेबसाईटवरील संचालक मंडळाच्या सदस्यांच्या यादीचा संदर्भ देत, रेडिअंट ग्रुपच्या संचाकल पदी संजय नायर, महेंद्र लोढा, नारायण शेषाद्री, अभय सोयी, प्रशांत कुमार आणि प्राची सिंग या सहा सदस्यांचा समावेश असल्याचे सांगितले आहे. अमिताभ यांचा रेडिअंटच्या संचाकल मंडळाशी काहीही संबंध नाहीय.
अमिताभ असिम्टोमॅटिक आहेत का?
अमिताभ हे असिम्टोमॅटिक असल्याचा व्हायरल झालेला दावाही रेडिअंटने खोडून काढला आहे. अमिताभ यांच्यामध्ये सौम्य लक्षणं दिसून येत आहे. त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अनेक रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ६५ हून अधिक वय असणाऱ्या रुग्णांना करोनाचा धोका अधिक असतो. त्याचप्रमाणे प्रकृतीसंदर्भातील इतर तक्रारी असतील तर सौम्य लक्षणं असल्यास रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्याचा सल्ला दिला जातो.
अमिताभ यांनी दाखल झाल्यानंतर रुग्णालयासंदर्भात ट्विट केलं?
नानावटी रुग्णालयाने १२ जुलै रोजी पत्रक प्रसिद्ध करुन अमिताभ यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचा कोणताही व्हिडिओ शूट करुन तो पोस्ट केलेला नाही असं स्पष्ट केल्याचे रेडिअंटने म्हटलं आहे.
“नेटकरी व्हायरल होणाऱ्या मेसेजमधील या सर्व माहितीची सत्यता पडताळून पाहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसेच गरज नसताना निर्माण करण्यात आलेल्या या वादावरील या स्पष्टीकरणामुळे अनेकांच्या शंका दूर होतील,” असंही रेडिअंटने म्हटलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 13, 2020 6:22 pm