सोशल मिडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका गाडीच्या छतामधून झाड बाहेर आल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटणं सहाजिक आहे. या गाडीतून एका रात्रीत झाड उगवल्याचा दावा हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांनी केला आहे. व्हिडिओमध्ये या गाडीच्या आजूबाजूला अनेक लोकं दिसत असून अश्चर्याने गाडीमध्ये डोकवून पाहताना दिसत आहेत.

गाडीचे छत फाडून त्यामधून झाड वर येणे हा दैवी चमत्कार असल्याचे सांगत हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग तसेच व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला जात आहे. ही घटना फ्रान्समधील असून तिथे एका रात्रीत उगवलेले हे झाडं सध्या आकर्षणा विषय ठरत आहे असं सांगितलं जात आहे. मात्र खरोखर या फोटोमागील सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास सोशल मिडियावरुन पसरवल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी अफवा असल्याचे सिद्ध होतं आहे.

या व्हिडिओसंदर्भात इंटरनेटवर सर्च केल्यावर हा व्हिडिओ फ्रान्समधील एका ओइस्ट फ्रान्स डॉट एफआर या वेबसाईटने प्रकाशित केल्याचे दिसून येते. हा व्हिडिओ फ्रान्समधील नट्स परिसरामध्ये चित्रित करण्यात आला आहे.

या वेबसाईटवरील वृत्तानुसार गाडीच्या छतामधून वर आलेले हे झाड म्हणजे एक कलाकृती आहे. रॉयल डिलक्स या थेअटर कंपनीने ८ नोव्हेंबर रोजी नट्स येथील बेलेवुमधील एका चौकात ही कलाकृती साकारण्यात आली होती. या कलाकृतीमध्ये गाडीचे छप्पर फाडून झाड वर आलेले दिसत आहे.

कंपनीनेच शेअर केलेल्या पोस्टवरुन भारतामध्ये दैवी चमत्काराच्या नावाखाली व्हायरल होणारा व्हिडिओ खोटा असल्याचे सिद्ध होत आहे.