युएईत आयपीएलचा तेरावा हंगाम रंगात आलेला असताना बीसीसीआयने भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा केली. टी-२०, वन-डे आणि कसोटी अशा तिन्ही संघांमध्ये सुनिल जोशी यांच्या निवड समितीने रोहित शर्माला स्थान दिलं नाही. आयपीएलमध्ये हॅमस्ट्रिंग इंज्युरीमुळे रोहित गेले दोन सामने खेळला नाहीये. यापुढील सामन्यांमध्येही तो सहभागी होईल की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. परंतू भारतीय संघाची निवड झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करतानाचा एक व्हिडीओ टाकला.

या व्हिडीओनंतर चाहत्यांमध्ये आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये संभ्रम वाढला. रोहित शर्मा जर सराव करत असेल तर त्याला नेमकी कसली दुखापत झाली आहे याची माहिती देणं बीसीसीआयने अपेक्षित असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. यानंतर सोशल मीडियावर रोहितने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन Indian Cricketer हा उल्लेख काढून Bio मध्ये बदल केल्याचे स्क्रिनशॉट व्हायरव व्हायला लागले. बीसीसीआय आणि रोहितमध्ये पुन्हा एकदा काही बिनसलं आहे का?? अशी शंका चाहते घ्यायला लागले.

मात्र, सोशल मीडियावर घेत असलेल्या या शंकेला कोणताही ठोस पुरावा नाहीये. ट्विटरवर एका नेटकऱ्याने ऑगस्ट महिन्यात रोहितच्या ट्विटर अकाऊंटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे, ज्यात त्याने आपल्या Bio मध्ये आधीपासूनच बदल केल्याचं दिसतंय. महत्वाची गोष्ट म्हणजे या स्क्रिनशॉटमध्ये रोहितचे 17m फॉलोअर्स दिसत असून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आताच्या स्क्रिनशॉटमध्ये रोहितच्या फॉलोअरर्सची संख्या वाढलेली दिसत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान न मिळाल्यामुळे रोहितने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरचा Bio बदलला हे स्पष्ट होत नाही.

भारतीय संघाची निवड करताना बीसीसीआयने, रोहित शर्मा आणि इशांत यांच्या दुखापतीवर बीसीसीआयची वैद्यकीय टीम लक्ष ठेवून असल्याचं सांगितलं. त्यामुळे आगामी काळात रोहितच्या फिटनेसमध्ये सुधारणा झाली तर कदाचीत त्याला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.