एक तरुण वासराला खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून चालत असल्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्या मुक्या जनावराला पुराच्या पाण्यातून वाचवण्यासाठी तरुणाची सुरु असलेली ती धडपड पाहून अनेकजण भावूक झाले होते. हा फोटो आसाम आणि केरळमधील असल्याचा दावे करण्यात येत होते. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सगळीकडेच हा फोटो व्हायरल झाला होता. फोटोला हजारो लाईक आणि शेअर मिळाले होते.

मात्र हा फोटो आसाम किंवा केरळमधील नसून बांगलादेशचा आहे. फोटोंना देण्यात आली कॅप्शन खोटी असल्याचं फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे. रिव्हर्स इमेज सर्चमध्ये या फोटोची पाहणी केली असता हा फोटो २०१४ मधील असल्याचं लक्षात येतं.

ढाका टाइम्सने १ जुलै २०१४ मध्ये छापलेल्या बातमीत हा फोटो वापरला होता. बांगलादेशमध्ये आलेल्या पुराची परिस्थिती दर्शवण्यासाठी या फोटोचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे हा फोटो आसाम किंवा केरळचा नसल्याचं स्पष्ट होत आहे.

फक्त सर्वसामान्यच नाही तर आनंद महिंद्रांसारख्या मोठ्या लोकांनीही हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी आनंद महिंद्रांनी फोटो शेअर केल्यानंतर रिट्विट केला होता. मात्र त्यांनी आता एक नवीन ट्विट करत हा फोटो केरळचा नसल्याचं म्हटलं आहे.

“तरुण खांद्यावर वासराला घेऊन जात असल्याचा फोटो जो मी तुमच्या ट्विटवरुन रिट्विट केला होता तो केरळचा नाही, बांगलादेशचा आहे. याआधी तो आसामचा असल्याची खोटी माहिती होती”, असं शशी थरुर यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.