टिकटॉक स्टार फैजल सिद्दिकी याचा टिकटॉक अकाऊंट बंद करण्यात आला आहे. महिलांवरील अॅसिड हल्ल्यांची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ त्याने टिकटॉकवर पोस्ट केला होता. या व्हिडीओविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रारसुद्धा करण्यात आली होती. फैजलचा व्हिडीओ सोशल मीडियाचे अनेक नियम मोडणारा असल्याने त्याचं अकाऊंटच बंद करण्यात आलं आहे. त्याआधी टिकटॉक या अॅपने त्याचा व्हिडीओ अॅपवरून काढून टाकला होता.

काय होता व्हिडीओ?

त्याच्या व्हिडीओत तो आधी एका मुलीला धमकी देतो आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर पाणी फेकतो. त्यापुढील दृश्यात मुलीचा विद्रुप चेहरा दाखवण्यात आला. या व्हिडीओतून फैजलने अॅसिड हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्याचं उदात्तीकरण केल्याची टीका करत महिला आयोगाने निषेध व्यक्त केला आहे.

टिकटॉक या अॅपवर लोकांना सुरक्षित वाटावं हे आम्ही प्राधान्याने पाहतो. अॅपच्या नियमावलीत आम्ही हे स्पष्टसुद्धा केलंय. या नियमांनुसार आम्ही टिकटॉकवर कोणताच आक्षेपार्ह व्हिडिओ ज्यात महिलांचा शारीरिक छळ किंवा त्यांच्यावरील अन्यायाला खतपाणी देणारी पोस्ट करण्याची परवानगी देत नाही. ज्या वादग्रस्त व्हिडीओची चर्चा होत आहे, तो आम्ही अॅपवरून काढून टाकला आणि संबंधिक व्यक्तीचा अकाऊंट सस्पेंड केला आहे, असं स्पष्टीकरण टिकटॉकच्या प्रवक्त्यांनी दिली.

टिकटॉक या व्हिडीओ अॅपवर फैजल सिद्दिकी हे नाव फार प्रसिद्ध आहे. या अॅपवर त्याचे १ कोटी ३० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. फैजलच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर #BanTikTok आणि #FaizalSiddiqui हे हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होऊ लागले होते.