कथुआ बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीवर नागरिकांकडून हल्ला. तोंडाला काळे फासले. महिलांकडून चपलांचा मार अशा आशयाची एक ध्वनिचित्रफीत व्हॉटस्अ‍ॅप आणि इतर समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाली आहे. परंतु ती ध्वनिचित्रफीत खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. कथुआ बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाच्या वकील दीपिका सिंह राजवत यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेली ध्वनिचित्रफीत बनावट असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपीला कडक बंदोबस्तात ठेवण्यात आल्याचे राजवत यांनी सांगितले.

खरे तर ध्वनिचित्रफितीत दिसणाऱ्या वाहनाच्या ‘नंबरप्लेट’वर एमपी-०२ (मध्य प्रदेश) अशी नोंद आढळली आहे. त्यामुळे पोलीस संरक्षणातील आरोपी उत्तर प्रदेश नव्हे तर मध्य प्रदेशातील असण्याची शक्यता आहे. याचवेळी ध्वनिचित्रफितीतील आरोपीच्या मागे देवनागरीत लिहिलेला ‘आरक्षी केंद्र हनुमान’ नावाचा फलकही दिसत आहे. त्यामुळे या ‘व्हिडीओ’चा कथुआशी काडीमात्र संबंध नाही.