18 January 2019

News Flash

फेकन्युज : कारच्या एसीमुळे कर्करोग?

भर उन्हात उभ्या असलेल्या कारमध्ये प्रवेश करताच प्रथम गाडीच्या खिडक्या खोलून आतील गरम हवा बाहेर जाऊ द्या.

बदलत्या जीवनशैलीशी संबंधित आजारांना तोंड देणाऱ्या सर्वसामान्यांना आरोग्यविषयक संदेश, इशारे, सल्ले देऊन घाबरवण्याची ‘फेकू’बहाद्दरांमध्ये स्पर्धाच लागलेली असते. त्यामुळे दररोज कोणत्या न कोणत्या समाजमाध्यमावर आरोग्याशी संबंधित खोटय़ा बातम्या पसरवल्या जात असतात. अशीच एक बातमी ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आणि फेसबुकच्या आद्यकाळापासून पसरवली जात आहे. ती म्हणजे..

‘कारमध्ये प्रवेश केल्या केल्या एसी चालू करू नका. त्यामुळे कर्करोग होईल!’

भर उन्हात उभ्या असलेल्या कारमध्ये प्रवेश करताच प्रथम गाडीच्या खिडक्या खोलून आतील गरम हवा बाहेर जाऊ द्या. त्यानंतर एसी चालू करा, असे हा संदेश सांगतो. या संदेशानुसार कारचे डॅशबोर्ड, आसने, एअर फ्रेशनर यातून ‘बेन्झिन’ हा घातक वायू उत्सर्जित होत असतो. बंद कारमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या श्वासोच्छवासाद्वारे हा वायू आपल्या शरीरात जातो. यामुळे आपल्याला कर्करोग होऊ शकतो, असे या संदेशात म्हटले आहे.

मात्र, कारमध्ये हा वायू उत्सर्जित होत नाही, हे जर्मनीतील संशोधकांनी सिद्ध केले आहे. त्यांनी केलेल्या प्रयोगादरम्यान, कडक उन्हात उभ्या असलेल्या बंद गाडीतून वेगवेगळ्या प्रकारचे वायू उत्सर्जित झाल्याचे आढळून आले. मात्र, या वायूंपैकी एकही विषारी नसल्याचेही स्पष्ट झाले. शिवाय या वायूंचे प्रमाणही अत्यल्प होते.

First Published on May 17, 2018 12:22 am

Web Title: fake news cancer due to car ac