व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक ही संवादाची माध्यमे असली तरी, त्यांचा उपयोग भावना भडकवणे, वितुष्ट निर्माण करणे, भावनिक बनवणे, अपप्रचार, अशा अनेक गोष्टींसाठी केला जातो. मानवी संवेदनशीलतेला साद घालत पसरवल्या जाणाऱ्या मजकुरांची तर आता पार हद्द झाली आहे. जगभरात या माध्यमांचा असा वापर केला जातो आहे. आता हेच छायाचित्र पाहा. व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रसारित करण्यात येत असलेल्या या छायाचित्रात एक हत्ती सिंहाच्या छाव्याला सोंडेत धरून नेत असल्याचे दिसते. ‘आजवर टिपलेले सर्वोत्तम छायाचित्र’ अशा मथळ्याखाली हे छायाचित्र प्रसारित करण्यात येत आहे. ‘एक सिंहीण छाव्याला घेऊन जंगलातून जात असताना उन्हामुळे थकून गेली. त्या वेळी हत्तीने त्या छाव्याला सोंडेत धरले व सिंहिणीला मदत केली. हे दृश्य एका छायाचित्राने अचूक टिपले,’ असे या चित्राखालील मजकूर सांगतो. पण प्रत्यक्षात छावा, हत्ती आणि सिंहीण यांची तीन छायाचित्रे मिसळून बेमालूमपणे बनवलेले कृत्रिम छायाचित्र आहे.