मनाई आदेश असतानाही भगवद्गीता आणि हिंदू धर्माशी निगडित साहित्याचे वाटप करणाऱ्या ‘इस्कॉन’च्या भाविकांवर पश्चिम बंगालच्या पोलिसांकडून हल्ला करण्यात आल्याच्या आशयाचे वृत्त पसरविणारी ध्वनिचित्रफीत व्हॉटस्अ‍ॅपवर प्रसारित झाली आहे. परंतु सत्यस्थिती अशी आहे की, सदर ध्वनिचित्रफीत ही २६ नोव्हेंबर २००८ रोजी गोव्यात घडलेल्या घटनेची आहे. याविषयी ‘गोवा हेरॉल्ड डॉट इन’ या विषयीचे वृत्त छापून आले होते. परंतु त्यातील बराचसा मजकूर कापण्यात आला आहे. हा मजकूर दहा वर्षे जुना असला कारणाने वा संकेतस्थळाच्या मांडणीत बदल करण्यात आल्याने याविषयीचा मजकूर सापडू शकला नाही. मात्र अन्य एका संकेतस्थळावरून या ध्वनिचित्रफितीविषयी माहिती मिळविण्यात आली. गोव्यातील काही स्थानिकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘हरे रामा हरे कृष्णा’ या पंथाच्या रशियन भाविकांना गोव्यात प्रवेशास मनाई केली होती. यावरून पोलीस आणि त्यांच्यात झटापट झाली. यात दोन पोलीस जखमी झाले. या प्रकरणी आठ रशियन नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.